कोरोना रुग्ण संख्या घटली : भुसावळातील तिघे खाजगी कोविड सेंटर बंद
भुसावळ : कोरोनाच्या दुसर्या लाटेत प्रशासनाकडून लॉकडाऊनसह व्यापक उपाययोजना राबवण्यात आल्यानंतर रुग्ण संख्येत घट होवू लागल्याने शहरातील तीन खाजगी कोविड सेंटर बंद करण्यात आले आहेत. रुग्णांअभावी शहरातील साईपुष्प कोविड हॉस्पिटल कोविड सेंटर, श्री रीदम हॉस्पिटल कोविड सेंटर व प्रतिभा कोविड सेंटर तूर्त बंद करण्यात आले आहेत.
सध्या 719 रुग्ण अॅक्टीव्ह
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, भुसावळात आतापर्यंत 12 हजार 975 रुग्णांना कोरोनाची लागण झाली व त्यातील 11 हजार 928 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली तर 328 रुग्णांचा मृत्यू ओढवला. गुरुवारी एका रुग्णाचा मृत्यू होवून दहा रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या 719 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.



ट्रामा सेंटरमध्ये होणार नॉन कोविड रुग्णांवर उपचार
शहरातील जळगाव रोडवर साकेगावलगत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात 50 बेडच्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. नंतर बाजूला असलेल्या ट्रामा सेंटरमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता अतिरीक्त 50 बेड रुग्णांसाठी टाकण्यात आले होते. एकूण या ठिकाणी 100 बेड कोरोना रुग्णांवर उपचारासाठी उपलब्ध होते मात्र ट्रामा सेंटरमध्ये फक्त नॉनकोविड रुग्णांसाठी उपचार करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन सुरू आहे. लवकरच नॉन कोविड रुग्णांसाठी उपचार करता येईल, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी मयूर चौधरी यांनी दिली.

