मुक्ताईनगरात तालुक्यात वादळाने केळीला फटका : आमदार चंद्रकांत पाटलांनी केली पाहणी


सरसकट पंचनामे करण्याच्या केल्या सूचना : मेंढोळदेतील 180 कुटूंब उघड्यावर : आमदारांनी केली जेवणाची व्यवस्था

मुक्ताईनगर : पूर्णा व तापी नदी किनारलगतच्या उचंदे गणातील पुरणाड, उचंदे , शेमळदे, पंचाणे, मुंढोदे , मुंढोळदे, नायगाव , पिंप्रीनांदू , बेलसवाडी, कर्की, पिंप्री पंचम भागात दि.27 मे रोजी दु 3.30 वाजेच्या सुमारास अचानक उद्धवलेल्या चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला असून हजारो हेक्टर वरील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या तसेच अनेक घरांची , गुरांच्या गोठ्याची पडझड झाली. विजेचे पोल व तारा तुटल्याने परीसर भग्न व अंधकारमय झाला. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची शुक्रवार, 28 मे 2021 रोजी सकाळी आठ वाजेपासून आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी संतोष नागतिळक, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी , ग्रामसेवक व कृषी सहायक अशा शासकीय फौजफाट्यासह पाहणी केली. यावेळी सरसकट पंचनामे करून तात्काळ अहवाल शासनाकडे सादर करणायच्या सूचना आमदार पाटील यांनी संबंधितांना दिल्या.

मुंढोळदेत उडाली घरांवरील पत्र : ग्रामस्थांची आमदारांनी केली जेवणाची सोय
मुंढोळदे गावातील सुमारे 180 वर घरांची पत्रे वादळात उडाली व मुसळधार पावसात भिजून सर्व डाळ, दाणा व अन्नाची नासाडी झाल्याने गुरुवारी रात्री पासून उपाशीपोटी असलेल्या गावकर्‍यांसाठी आमदार पाटील यांनी स्वखर्चातून सकाळ, संध्याकाळ जेवणाची व्यवस्था केली. सदरील जबाबदारी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले हे पार पाडीत आहेत. गावातील उद्ध्वस्त घरे तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा उभी करण्यासाठी आमदारांनी पदरमोड करून 15 मजुरांची टीम सहकार्यासाठी तत्काळ उपलब्ध केली.



यांची होती उपस्थिती
यावेळी आमदारांसह काँग्रेस जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, दिलीप पाटील, राजेंद्र तळेले, स्वीय सहायक प्रशांत पाटील व इतर पदाधिकारी शेतकरी तसेच गावकरी उपस्थित होते.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !