भुसावळातील महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी परीवहन विभाग सचिवांना मुख्यमंत्री कार्यालयातून निर्देश


भुसावळ : शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गालगत सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाल्यानंतर किरकोळ अपघात झाल्यानंतर शिवसेनेने महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या मात्र त्यानंतरही महामार्ग प्राधिकरणाला जाग येत नसल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत राज्याचे अतिरीक्त मुख्य सचिव तथा परीवहन विभागाचे सचिव आशिषकुमार सिंह यांना मुख्यमंत्री कार्यालयातून निर्देश देण्यात आले आहेत. आता शहरवासीयांचे पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

खड्ड्यांमुळे वाढले होते अपघात
चौपदरीकरणादरम्यान रस्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. काही ठिकाणी खोदकाम करून दोन ते तीन महिने उलटून गेले तरी पुढील काम सुरू केले जात नसल्याने वाहनचालकांसह परीसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यामुळे दररोज अनेक अपघात होत असल्याने भुसावळ शिवसेनेतर्फे प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी लवकरच भेट घेणार आहेत.



आंदोलनाशिवाय पर्याय नाही : संतोष सोनवणे
मार्च महिन्यात खोदकाम केले पण त्यानंतर अत्यंत संथपणे रस्त्यांचे काम होत असून अर्धवट कामामुळे नागरीक त्रस्त आहेत. ही कामे तातडीने पूर्ण करावी अन्यथा नागरीकांसमवेत आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. संथ गतीने होणार्‍या या कामास पूर्णत: महामार्ग प्राधिकरण प्रशासन जबाबदार असल्याचे शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे म्हणाले.

उपचाराचा खर्च प्राधिकरणाने द्यावा : धीरज पाटील
खोदकामामुळे रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले असून रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षा कोठडा नसल्याने शेख जावेद यांची गाडी खड्ड्यात पडली, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. नुकसान भरपाईसह उपचाराचा खर्च महामार्ग प्राधिकरणाने देणे अपेक्षित असल्याचे शिवसेनेचे भुसावळ तालुका संघटक प्रा.धीरज पाटील म्हणाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !