रावेर तालुक्यात पुन्हा वादळाचा तडाखा
शेकडो हेक्टरवर केळी बागा भुईसपाट ; घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड : विद्युत तारा उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित
रावेर : रावेर तालुक्यात पुन्हा झालेल्या वादळी पावसाने केर्हाळा, अहिरवाडी, मोहगम, पिंप्री, मंगळूर, कर्जोदच्या शेती शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे विजेच्या तारा तुटल्या तर वीज पोलवर झाडे उन्मळून पडल्याने या भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे. शेकडो हेक्टरवरील केळी भुईसपाट झाली असून, अनेक घरांची पुन्हा पडझड झाली आहे. दरम्यान, आठवडे भरापूर्वी झालेल्या वादळी वार्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम अपूर्ण असताना पुन्हा अवकाळीने नुकसान केल्याने शेतकर्यांना सरसकट भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.
रावेर तालुक्यात निसर्ग कोपला
रावेर तालुक्यात केळीवर निसर्ग कोपला असून 27 व 29 मे व पुन्हा बुधवार, 2 जून रोजी मध्यरात्री आलेल्या वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे केर्हाळा, अहिरवाडी, मोहगम, परीसरातील केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर करोडो रुपयांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या. अनेक ठिकाणी वादळाच्या तडाख्याने झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. अहिरवाडी व मोहगम या रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या व वीजपुरवठा खंडित झाला. तालुक्यात बहुतांशी भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. मध्यरात्री अनेक न्याल्यांना पूर आल्याचे शेतकर्यांनी सांगितले.



