माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्तम कामगिरीमुळे चिनावलची निवड
रावेर : राज्य स्तरावरुन माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणार्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जळगाव जिल्ह्यातून पहुर व चिनावल (ता.रावेर) ची निवड करण्यात आली आहे. शनिवार, 5 रोजी राज्यभरात मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित निवड झालेल्या ग्राम पंचायतीचा ऑनलाईन सन्मान सोहळा होणार आहे.
सर्वोत्तम कामगिरीने चिनावलचा समावेश
शनिवारी जागतिक पर्यावरण दिना निमित्त ‘माझी वसुंधरा संदर्भा’त ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीप आदी उपस्थितीत ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. अभियानांतर्गत सन 2020-21 मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारीत स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेंतर्गत ग्रामपंचायतींच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणार्या ग्रामपंचायतीमध्ये चिनावल ग्रामपंचायतीचा समावेश आहे.



निवड झाल्याचा आनंद : दीपाली कोतवाल
चिनावल गावाची राज्यस्तरावर निवड झाल्याचा आनंद आहे. पंचतत्वांवर आधारीत सर्व स्तरातील कामे त्या गावात झाली आहे. माझी वसुंधरात महाराष्ट्र भरातून तीन गावांची निवड झाली असून शनिवारी चिनावलचा कितवा क्रमांक मिळेल हे कळणार आहे. आमच्या सर्व टिमने यासाठी खुप मेहनत घेतली असून शासनाचे आदेश माझी वसुंधरा संदर्भात वेळो-वेळी फॉलो केल्याने योग्य नियोजन केल्याने निवड झाल्याचा आनंद असल्याचे गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी सांगितले.

