भुसावळच्या विद्यार्थ्याचा गिनीज बुकने केला सन्मान
ताप्ती स्कूलच्या कृष्णा ढाकेने बनविलेल्या उपग्रहाची जागतिक स्तरावर दखल
भुसावळ : अंतराळात सोडलेल्या उपग्रहांमधून उत्कृष्ट उपग्रहाची दखल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. यात भुसावळच्या ताप्ती पब्लिक स्कूलचा दहावीचा विद्यार्थी कृष्णा ढाके याने सोडलेल्या उपग्रहांचाही समावेश आहे. त्याबद्दल कृष्णा यास गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसह अशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या संशोधनामुळे भविष्यात विविध संशोधन करणार्या संस्थेला भेट देण्याची मोठी संधी मिळू शकते.
फेब्रुवारी महिन्यात उपग्रह सोडण्याचा जागतिक
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन हाऊस ऑफ कलाम व स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 7 फेब्रुवारी 2020 रोजी रामेश्वरम येथे अंतराळात लहान लहान असे छोटे छोटे 100 उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम करण्यात आला. त्यात देशभरातील एक हजार व महाराष्ट्रातील 380 विद्यार्थी सहभागी झाले होते. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच नागपूर व पुणे येथे एक दिवसाचे वर्कशॉप घेण्यात आले. यात कृष्णा ढाके याने सहभाग घेतला होता.



राष्ट्रीय अणि जागतिक पातळीवर पाच रेकॉर्ड
कृष्णा याने छोट-छोटे फेम्टो सॅटेलाईट बनवले होते. हेलियम बल्लूनच्या सहाय्याने 100 उपग्रह अंतराळात सोडण्यात आले. त्यांची कृषी विषयक शास्त्रीय अभ्यासाला उपयुक्त माहिती तसेच ओझोन वायूचा स्तर, रेडिएशन्सची माहिती, ग्लोबल वॉर्निंग व इतर विविध प्रकारच्या शास्त्रीय माहिती उपग्रहाद्वारे मिळाली. याची दखल घेत राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
अंतराळ क्षेत्रात करीअरची इच्छा
कृष्णा हा गण गण गणात बोते आयटीआयचे अध्यक्ष सतीश ढाके यांचा मुलगा आहे. भविष्यात या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला विविध प्रकारची उपकरणे बनवून त्याच्या नोंदी घेण्याचा छंद आहे. त्याचे प्रिंसीपल निना कटलर यांनी कौतुक केले. यासाठी त्याला ठाणे येथील प्रा.डॉ.मिलिंद चौधरी, मनीषा चौधरी यांचे सहकार्य लाभले.

