अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू
यावल : यावल-भुसावळ मार्गावरील वाघळूद फाट्याजवळ रविवारी सकाळी जखमी अवस्थेत हरीण आढळले. अज्ञात वाहनाच्या धडकेने ते जखमी झाले होते. त्या हरणावर उपचाराची तत्परता न दाखवता वनाधिकारी वृक्षारोपणासाठी निघून गेले. परिणामी उपचाराअभावी या जखमी हरणाचा मृत्यू झाला. संबंधित अधिकार्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मनसेने केली आहे. रविवारी अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच वर्षीय नर हरण जखमी झाले होते. शहरातील मनसेचे कार्यकर्ते विक्की बाविस्कर, प्रशांत बारी, आकाश चोपडे हे भुसावळकडून येत होते. त्यांना हे जखमी हरीण दिसले. त्यांनी हरणाला वनविभागाच्या कार्यालयात आणले. वनक्षेत्रपाल विशाल कुटे यांना उपचार करण्याची विनंती केली. मात्र, कुटे यांनी आपण वृक्षरोपणासाठी जात आहोत, असे सांगत जखमी हरणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मनसेच्या पदाधिकार्यांनी पशुवैद्यकिय डॉक्टरांचा शोध घेतला. मात्र, विलंब झाल्याने हरणाचा मृत्यू ओढवला. वनविभागाच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याने जखमी हरण दगावल्याचा आरोप मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी केला.
उपचाराबाबत सूचना दिल्या -आरोप चुकीचा
जखमी हरणाला घेऊन मनसे कार्यकर्ते आले होते. त्यावेळी कर्मचार्यांना जखमी हरणावर उपचार करण्याच्या सूचना देऊनच आपण निघालो होतो. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.भगुरे वेळीच उपचारासाठी आले होते. मनसेचा आरोप चुकीचा आहे, असे वनक्षेत्रपाल कुटे यांनी सांगितले.



