यावलमध्ये एक्सप्रेस फिडरचे काम अंतिम टप्प्यात


42 लाखाच्या निधीतून फिडरची उभारणी ; पाणीपुरवठ्यातील अडचणी सुटणार

यावल : नगरपालिकेच्या वतीने शहरात अखंडित पाणीपुरवठा होण्यासाठी तलाव व जलशुद्धीकरण केंद्रावर एक्सप्रेस फिडरची उभारणी करून विद्युत पुरवठा होणार आहे. 42 लाखांच्या निधीतून सुमारे पाच किमी अंतराचे नवीन 11 केव्हीएचे विद्युत एक्सप्रेस फिडर उभारण्यात आले असून काम अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी या कामाची पाहणी नगरपालिकेचे गटनेता अतुल पाटील व विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता दिलीप मराठे यांनी केली.

42 लाखांचे काम अंतीम टप्प्यात
शहरात पाणी पुरवठ्यासाठी बोरावल रस्त्यावर साठवण तलाव आहे. तेथून शहराबाहेर असलेल्या जलशुध्दीकरण केंद्रावर पाईप लाईनद्वारे पाणी उचल केली जाते. नंतर त्यावर शुध्दीकरण प्रक्रिया करून शहरात पाणीपुरवठा होतो. साठवण तलाव व जलशुध्दीकरण केंद्रावर असलेले विद्युत कनेक्शन हे शहरातील व शेती क्षेत्रातील आहे. परीणामी शेती क्षेत्र असो की शहरी भाग कुठेही काही तांत्रिक बिघाड झाला तर तलाव व जलशुध्दीकरण केंद्रावरील वीजपुरवठा तास न् तास खंडित रहायचा. परीणामी शहरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परीणाम व्हायचा. तेव्हा या दोन्ही ठिकाणी अखंडीत विद्युत पुरवठ्याकरीता स्वतंत्र एक्स्प्रेस फिडर व्हावे म्हणून पालिकेचे गटनेता अतुल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी वैशिष्ठ्यपूर्ण योजनेतून एक्सप्रेस 42 लाखांचा निधी उपलब्ध करून घेतला. आता या निधीतून काम सुरू करण्यात आले असून ते पूर्णत्वाकडे आले आहे.



गटनेत्यांनी केली कामाची पाहणी
या कामाची सोमवारी गटनेता अतुल पाटील, विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता दिलीप मराठे यांनी पाहणी केली व लवकरच साठवण तलावावर ट्रान्सफार्मर टाकून एक्स्प्रेस फिडर कार्यन्वित होत अखंडीत वीजपुरवठा येथे राहिल व शहरात अखंडीत पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. या पाहणी प्रसंगी गणेश भालेराव-महाजन, धीरज महाजन, एजाज देशमुख, पंकज पांडे, पियुश इंटर प्रायजेसचे जंगले, अजय भालेराव आदींची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !