संदिग्ध अध्यादेशामुळे वाढली पथदिव्यांची वीजबिल थकबाकी


साकेगाव ग्रामपंचायतीचे निवेदन ; जिल्हा परीषद प्रशासनाशी केली चर्चा

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील पथदिवे थकीत वीज बिलामुळे बंद आहेत. याबाबत ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, विष्णू सोनवणे यांनी जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.बोेटे यांना निवेदन देऊन शासनाच्या अध्यादेशासंदर्भात चर्चा केली. ग्रा.पं.पथदिव्यांच्या बिलाच्या संदर्भातील अध्यादेशच संदिग्ध असल्याचे प्रभारी सरपंच ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले.

महावितरणने केले कनेक्शन कट
महावितरण कंपनीने ग्रामपंचायत प्रशासनाचे पथ दिव्यांचे कनेक्शन कट केले आहे. या संदर्भात प्रभारी सरपंच ठाकरे यांनी उद्योग, उर्जा व कामगार विभागाचा 16 मे 2018 चा नवीन जीआरचा अभ्यास केला. त्यामध्ये मुद्दा क्रमांक चार मध्ये स्पष्टपणे 31 मार्च 2018 पूर्वी जे पथदिवे ग्रामपंचायत भागात आहेत, त्यांची पुढील वीज देयकाची रक्कम ग्रामविकास विभागाने महावितरण कंपनीकडे शासन अनुदान किंवा 14 व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून भरणा करावी. तसेच 31 मार्च 2018 नंतरच्या आस्थापित झालेल्या पथदिव्यांच्या वीज देयकाची रक्कम संबंधित ग्रामपंचायतीकडून महावितरण कंपनीस अदा करण्यात यावी. नवीन वेगळे मीटर लावण्यात यावे, असा उल्लेख आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायतींच्या 2018 पूर्वी व पुढील वापरलेल्या पथदिव्यांच्या वीज बिलाची रक्कम राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने भरायची आहे, असे स्पष्ट होते. याबाबत ठाकरे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोेटे यांना निवेदन दिले. यावेळी बीडीओ विलास भटकर, सरपंच योगीता सोनवणे यांचे पती विष्णू सोनवणे उपस्थित होते.



मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा
पथदिव्यांच्या बिलांच्या प्रश्नी शासनाने तत्काळ मार्ग काढावा. जीआरमध्ये नमूद केलेल्या बाबी संदिग्ध व अस्पष्ट आहेत. या प्रकरणी राज्य शासनाने त्वरीतत मार्ग न काढल्यास मंत्रालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा प्रभारी सरपंच आनंद ठाकरे यांनी दिला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !