राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भुसावळच्या हंसिका महालेचे यश
भुसावळ : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शाळा फाउंडेशन, बार्शी यांनी आयोजित केलेल्या ‘कोण होणार महाराष्ट्राचा शिवभक्त’ या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यात इयत्ता पहिली ते चौथीच्या गटात भुसावळची हंसिका नरेंद्र महाले ही प्रथम विजेती ठरली. कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व राजमाता जिजाऊंचे संस्कार हे समाजापुढे भाषणाच्या माध्यमातून येण्यासाठी या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यातून 742 स्पर्धक सहभागी
या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून एकूण 742 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या सर्व स्पर्धकांची भाषणे राज्यभरातून व देशभरातून दीड लाख लोकांनी शाळा फाउंडेशन या युट्युब चॅनलच्या माध्यमातून पाहिली असल्याची माहिती संयोजक प्रतापसिंह मोहिते यांनी दिली. हंसिका महिलेच्या यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.



