भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींचा पोलिसांकडून शोध
भुसावळ नगरपालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ प्रकरण
भुसावळ : अतिक्रमण झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना माजी आमदार संतोष चौधरी यांनी शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली होती. याप्रकरणी चौधरी यांच्याविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू केला आहे.
अनधिकृत बांधकाम हटविण्यास विरोध
पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या तक्रारीनुसार, सोमवार, 14 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सतीश दिघे यांनी सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामाबाबत दखल घेण्याचे आदेश दिल्यानंतर नगर रचनाकार भटू पवार, सहाय्यक नगररचनाकार शुभम आडकर, कर निर्धारण अधिकारी व प्रशासकीय अधिकारी रामदास मस्के, वसुली लिपीक अनिल भाकरे, चालक रमेश गुंजाळ यांच्यासह चारचाकी (एम.एच.35 ए. जी.0317) ने सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर गेल्यानंतर यावेळी माजी आमदार संतोष चौधरी आले व त्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जिल्हाधिकार्यांना जागेबाबत अहवाल पाठवल्यास याद राख, अशी तंबी देत अंगावर धावून आल्याचा आरोप आहे. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक मंगेश गोटला करीत आहे.



