मेगा रीचार्ज प्रकल्पास स्व.हरीभाऊंचे नाव देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार : रक्षा खडसे
यावल : स्व.हरीभाऊ जावळे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मला संधी दिली त्यांच्यामुळेच मला खासदार होता आले. मेगा रीचार्ज प्रकल्पासाठी त्यांनी अनेक वर्षे प्रयत्न केले. आता या प्रकल्पाचा डीपीआर येण्याच्या स्थितीत असताना नेमके हरिभाऊ आपल्यातून निघून गेले मात्र त्यांचे स्वप्न असलेला प्रकल्प पूर्ण करण्यात येईल तसेच मेगा रीचार्ज प्रकल्पास स्व.हरीभाऊंचे नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार रक्षा खडसे यांनी दिली. माजी खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त भालोद (ता.यावल) या त्यांच्या गावी आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
स्व.जावळे यांचा वारसा अमोल जावळेंनी पुढे न्यावा : गिरीश महाजन
कमालीचे पक्षनिष्ठ, सच्चे स्वयंसेवक असलेले स्व.हरिभाऊ जावळे हे भाजपसाठी अनमोल ठेवा होते. संपूर्ण देश मोदीमय झालेला असताना हरीभाऊंना लोकसभेची तिसर्यांदा उमेदवारी जाहीर झाली. ते सहज चार लाखांच्या फरकाने निवडून आले असते. पण, अगदी शेवटच्या दिवशी त्यांचे तिकीट कापून रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाली. तरीही हरीभाऊंनी संयम दाखवला. सत्ता-खुर्चीसाठी रुसवे-फुगवे धरले नाही. अन्यथा आमदार, खासदार, मंत्री होऊनही काही लोक समाधान नसतात. या पार्श्वभूमीवर स्व.हरिभाऊ जावळे यांचा वारसा अमोल जावळेंनी पुढे न्यावा. संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत असल्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.



यांची होती उपस्थिती
यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, कै.जावळे यांच्या पत्नी कल्पना जावळे, चिरंजीव अमोल जावळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवळकर, राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, संचालक नरेंद्र नारखेडे, जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरूजित चौधरी, अतुल भालेराव, माजी शिक्षण व आरोग्य सभापती हर्षल पाटील, कृषीभूषण नारायण चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक गणेश नेहेते, दिलीप हरी चौधरी, मनोज जावळे, संजय ढाके, भालोद सरपंच प्रदीप कोळी, उपसरपंच कामिनी जावळे, नीळकंठ चौधरी, अरुण चौधरी, माजी नगराध्यक्ष पिंटू राणे,विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, सुरेश पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष सागर कोळी, योगेश साळुंके आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा.जतीन मेढे यांनी केले.
संत-महतांची उपस्थिती
या कार्यक्रमात इंदौर येथून अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री महामंडलेश्वर स्वामी मनमोहन दासजी उर्फ श्री राधे राधे बाबा यांची विशेष उपस्थिती होती. सोबत महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज, शास्त्री भक्तीकिशोरदासजी महाराज, मानेकर बाबा, महामंडलेश्वर स्वरूपानंदजी महाराज कार्यक्रमात हजर होते.

