भुसावळात रेल्वेच्या पेन्शन अदालतीत 65 तक्रारींचा निपटारा
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी मंगळवारी डीआरएम कार्यालयात ऑनलाईन पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले. त्यात प्राप्त 65 तक्रारींचे निराकरण करण्यात आले. ज्यामध्ये सहा लाख 59 हजार 793 रुपयांची रक्कम देण्यात आली. डीआरएम कार्यालयात आयोजित पेन्शन अदालतीचे मुख्य न्यायाधीश डीआरएम विवेककुमार गुप्ता, एडीआरएम मनोजकुमार सिन्हा होते. यावेळी लेखा व कार्मिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी वीरेंद्र वडनेरे यांनी केले. नाशिक पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस.जी.कुलकर्णी यांनी पेन्शन धारक व प्रशासनाच्या समस्या निवारणासंबंधी सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले. कोरोना काळात देखील रेल्वे प्रशासन पेन्शनर्सच्या तक्रारींचे निराकरणासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले. आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके यांनी मानले. सेटलमेंट आणि लेखा विभागातील तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचार्यांनी सहकार्य केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाला.




