वेतन विभागाच्या ढिसाळ कारभाराचा शिक्षकांमध्ये संताप
खा.प्रा.शिक्षक महासंघाचे शिक्षण सभापती, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षकांना निवेदन
भुसावळ : वेतन विभाग (प्राथमिक) कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्हाभरातील शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शासनाकडून अनुदान उपलब्ध असूनही शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाही, विचारणा केल्यास प्राथमिक वेतन कार्यालयाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ भुसावळ च्या वतीने शिक्षण सभापती रवींद्र पाटील, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, वेतन अधीक्षक राजश्री संदानशिवे यांना गुरुवार, 17 रोजी निवेदन दिले.
निवेदनात या मागण्यांचा समावेश
100 टक्के तसेच 20 टक्के शाळा कर्मचार्यांचे पगार शासन नियमाप्रमाणे तसेच नियमितपणे एक तारखेला करावे, पी.एफ. धारक कर्मचार्यांच्या स्लीप वेतन विभाग कार्यालयाकडून शाळांना दरवर्षी वेळेत पुरविण्यात याव्या तसेच संबंधित रजिस्टर वेतन कार्यालयातील संबंधित टेबलावरील कर्मचार्याकडून नियमित अद्यावत करून घेण्यात यावे, डीसीपीएस धारक कर्मचार्यांचा हिशोब तात्काळ मिळावा, डीसीपीएस खात्याचा क्लोजिंग बॅलन्स एनपीएसच्या खात्यामध्ये ओपनिंग बॅलन्स म्हणून खात्यांमध्ये अद्ययावत करण्यात यावा, एनपीएस खात्यांमधून दर महिन्याला कपात केलेली रक्कम नियमित व वेळेवर एनपीएसच्या खात्यांवर वर्ग करण्यात यावी, मेडिकल तसेच पुरवणी बिले जमा केलेल्या रजिस्टर नुसार अनुक्रमे मंजूर व्हावीत अशी मागणी करण्यात आली.



निवेदन देताना यांची उपस्थिती
यावेळी खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे, तालुका सचिव जीवन महाजन, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत धांडे, शिक्षकेतर कर्मचारी समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष मराठे, देव सरकटे, मिलिंद कोल्हे, विजय झोपे, दीपक तेली, अमित चौधरी, दीपक टोके, तेजेंद्र महाजन, साबिर अहमद, हितेश सरोदे, योगेश बोरसे, विकास शेळके आदी उपस्थित होते.
संयुक्त बैठक घेऊन समस्या सोडविल्या जातील -अकलाडे
वेतन विभाग प्राथमिक व संघटनेच्या पदाधिकार्यांची संयुक्त बैठक घेऊन शिक्षकांच्या वेतन संदर्भातील, डीसीपीएस हिशोब व मेडिकल बिलासंदर्भात येणार्या अडचणी सोडविण्यात येतील असे आश्वासन शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिले.
लवकरात लवकर शिक्षकांच्या समस्या मार्गी लावू -रवींद्र पाटील
शिक्षक संघटना व शिक्षण विभागातील अधिकारी यांची बैठक घेऊन शिक्षकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावू, असे शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी सांगितले.

