खरीप हंगामात नियमांची पायमल्ली : 54 कृषी केंद्र चालकांना नोटीस
रावेर : बियाणे व खतांचा काळाबाजार होऊ नये यासाठी कृषी विभागाने तालुक्यातील कृषी केंद्रांची तपासणी केली असता त्यात 54 कृषी केंद्र चालकांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केलेले नसल्याचे दिसून आल्याने या कृषी केंद्र चालकांना कृषी विभागाने नोटीस बजावल्याने शहरात खळबळ उडाली.
कारवाईकडे लागले लक्ष
खरीप हंगामाची शेतकर्यांकडून तयारी सुरू असून बी-बियाणे तसेच खते घेण्यासाठी शेतकर्याची धावपळ सुरू आहे मात्र संधीचा फायदा घेऊन कृषी केंद्र चालकांकडून जादा दराने बियाणे व खते विक्री होण्याची शक्यता असते. यावर कडक निर्बंध कृषी विभागाने लावले आहेत. तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे व पंचायत समितीचे कृषी अधिकारी एल.ए.पाटील यांच्या पथकाने तालुक्यातील कृषी केंद्रांची तपासणी केली. त्यात नियमांचे पालन व पूर्तता न करणार्या 54 कृषी केंद्र चालकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. सात दिवसात लेखी खुलासा सादर न करणार्या कृषी केंद्राचा अहवाल कारवाईसाठी जिल्हास्तरावर पाठविण्यात येणार आहे. शेतकर्यांनी बियाणे व खते विकत घेतांना कृषी केंद्र चालकांकडून पक्के बिल घ्यावे. शासनाने निश्चित केलेल्या भावापेक्षा जादा दराने खते व बियाणे विक्री करणार्या कृषी केंद्रांची तक्रार करावी. यासाठी पंचायत समितीत स्वतंत्र तक्रार कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे कृषी अधिकारी एल.ए.पाटील म्हणाले.



