मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण द्यावे


बोदवड शहरातील जमियत उलेमा हिंदतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

बोदवड : मुस्लिम समजाला शिक्षणासह नोकरीत 10 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी जमियत उलेमा हिंद बोदवडतर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली तसेच निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली. देशातसह राज्यात मुस्लिम समाजाच्या असणार्‍या परीस्थितीवर अनेक कमिशन नेमण्यात आली. प्रत्येक कमिशनने वेळोवेळी मुस्लीम समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण शासनाच्या निदर्शनास आणून देणारा अहवाल सादर केला. मात्र हे अहवाल हे केवळ कागदोपत्री राहिले असून शासन दरबारी मात्र आरक्षणाच्या दृष्टीने अनास्था दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकारनेदेखील आपल्या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केलेले मात्र अद्यापही आश्‍वासनपूर्ती केलेली नाही.

विविध समित्यांची शिफारस मात्र दखल नाही
मुस्लिमांना आरक्षण मिळण्यासाठी तत्कालीन सरकारने ही काही पावलं उचलली नाहीत. रंगनाथ मिश्रा कमिशन, न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समिती सहित मेहमदूर रेहमान समितीच्या अहवालातून मुस्लिम समाजाची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व शासकीय नोकरीत मुस्लिम समाजाची परीस्थिथी समोर आलेली आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची शिफारस सर्व समितींनी केली मात्र अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही.




निवेदनात या मागण्यांचा समावेश
सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा समिती आणि महेमदूर रहेमान समितीच्या अहवालाप्रमाणे मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि रोजगारामध्ये तात्काळ 10 टक्के आरक्षण देण्यात यावे, मुस्लिम समाजातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण संशोधन संस्था जसे की बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर प्रशिक्षण संस्था संशोधन केंद्र सुरू करावे, मुस्लिम समाजावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी अ‍ॅट्रासिटीसारखा अल्पसंख्यांक अन्याय अत्याचार प्रतिबंधक संरक्षण कायदा तयार करून त्याची लवकरात-लवकर अंमलबजावणी करावी, मॉबलिंचीगच्या घटना रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मॉबलिंचीग विरोधात कायदा तयार करण्यात यावा, जिल्हा पातळीवर मुस्लिम विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा मिळण्यासाठी हॉस्टेलची उभारणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

निवेदन देताना यांची उपस्थिती
तहसीलदारांना निवेदन देताना जमियत उलेमा हिंदचे मौलवी अमीन, हाफिज फिरोज, हाफिज महेबूब तसेच शहरातील युवक शेख जाबीर, ईरशाद कुरेशी, जफर शेख, नईम खान बागवान आदी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !