भुसावळ पोलिस दल सतर्कतेत पास
रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल : पोलिस दलाची सज्जतेची केली तपासणी
भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावर बेवारस बॅगमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तू तसेच आतकंवाद्यांनी नागरीकांनी ओलीस ठेवण्याची माहिती बाजारपेठ व शहर पोलिसांनी नियंत्रण कक्षाला दिली. यानंतर घटनास्थळी तगडा पोलिस ताफा पोहोचला. ओलीस धरुन ठेवलेल्या नागरीकांची सुटका, आतंकवाद्यांना अटक व बॉम्बसदृष्य वस्तूचा शोध असे पोलिसांची मॉकड्रिल शनिवारी सकाळी घेण्यात आले. यातून भुसावळ पोलिसांचे प्रसंगावधान व सुसज्जता तपासण्यात आली. सुरक्षा व्यवस्था तसेच अनुचित प्रकार घडल्यास पोलिस दल सज्ज आहे किंवा नाही? यादृष्टीने अचानक चाचपणीसाठी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी मॉकड्रिल घेतले. भुसावळ रेल्वे स्टेशनवर एक बेवारस बॅग असून त्या बॅगमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आहे. तसेच दहशतवादी शिरल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार तात्काळ सर्व पोलिस अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले. स्थानिक पोलिसांशिवाय शिघ्र कृती दल व बॉम्बशोधक पथकाची देखील गरज आहे, याची खात्री पटल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस मुख्यालय जळगाव या ठिकाणावरून या दोन्ही पथकांची मागणी केली. काही वेळातच सदरची पथके त्या ठिकाणी पोहोचले. सर्वप्रथम शिघ्र कृतीदल पथकाने दहशतवाद्यांनी ज्या ठिकाणी नागरीकांना ओलीस ठेवले आहेत, त्या ठिकाणाची माहिती घेतली व तत्काळ अतिशय शिस्तबद्ध कारवाई करून सदर ओलीस ठेवलेल्या इसमांची सुटका केली.
तत्परता तपासण्यासाठी मॉकड्रिल
दरम्यानच्या काळामध्ये तेथे असलेल्या पोलिस अंमलदारांनी तसेच आरसीपी पथकाने संपूर्ण परिसर हा निर्मनुष्य केला. त्यानंतर एक-एक साहित्याच्या साहाय्याने रेल्वे स्टेशन पार्किंग मध्ये ठेवण्यात आलेली बेवारस बॅग चेक केली. बॉम्बशोधक पथका कडील डॉगने देखील सहभाग घेतला. बेवारस बॅग शोधून बॉम्ब सदृश्य वस्तू डिफ्युज करण्यात आली. हे सर्व नाट्यमय प्रकार पोलिसांची सुसज्जता, तत्परता तपासणीसाठी करण्यात आली. या सर्व घटामोंडींमुळे मात्र शहरात नेमके काय सुरु आहे, पोलिसांची इतका मोठा ताफा याबाबत चर्चा रंगली हेाती.



दंगा काबूचाही केला सराव
आगामी काळातील सणउत्सव, निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर पोलिस दले सुसज्ज असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पोलिसांकडून दंगा काबू योजनेचा सराव घेण्यात आला. सरावात पोलीस स्टेशन बाजारपेठ, पोलीस स्टेशन भुसावळ शहर, पोलिस स्टेशन भुसावळ तालुका, नशिराबाद, शहर वाहतूक शाखा त्याचप्रमाणे पोलिसांकडील असे आरसीपी पथक इत्यादी सामील झाले होते.
अश्रृधुर नळकांड्याचे प्रात्याक्षिक
दंगाकाबू सरावाच्या दरम्यान पोलिसांकडील हत्यारे देखील तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे लाठीचा वापर, अश्रुधुराचा वापर कसा करावा याबाबत देखील प्रात्यक्षिक घेण्यात आले.त्यावेळी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी गॅस गन चा वापर करून सराव केला. पोलिस दल सर्व आवश्यक त्या उपकरणांसह सज्ज असल्याचा सज्ज असल्याचे या प्रात्याक्षिकातून समोर आले.
यांनी घेतला सहभाग
या दोन्ही सराव व मॉकड्रिलमध्ये बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये, मंगेश गोंटला, साहाय्यक पोलीस निरीक्षक दुनगुहू, चव्हाण, व या सर्व पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार सामील झाले होते.
सुसजता तपासणी केली
भुसावळ पोलीस उपविभागामध्ये रेल्वे स्टेशन, भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी, आर्मीचे आर्टिलरी सेंटर, दिपनगर औष्णिक विद्युत प्रकल्प हे महत्त्वाचे स्थळे आहे. त्या ठिकाणची सुरक्षा विभागाचे महत्त्वाचे काम आहे. या धर्तीवर मॉकड्रील व सराव केला, असे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे म्हणाले.

