भुसावळातील अमृत योजनेच्या कामावर आमदारांची नाराजी
संथ पाणीपुरवठा योजनांचा आमदारांनी बैठकीत घेतला आढावा
भुसावळ : शहरातील अमृत पाणीपुरवठा योजनेसह तालुक्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा बुधवारी आमदार संजय सावकारे यांनी प्रांताधिकारी कार्यालायत आढावा घेतला. शहरातील अमृत योजना रखडल्याने आजच्या स्थितीत आठ दिवसांआड अशुध्द, गाळमिश्रीत पाणी मिळत आहे. पाईप लाइन नंतर खड्डे बुजवून रस्ते केले जात नसल्याचा प्रश्न आमदार सावकारे यांनी उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, एमजीपीचे कार्यकारी अभियंता एस. जी. निकम, ए. जी. चव्हाण, एस. पी. लोखंडे, वरणगाव नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे, भुसावळचे नितीन लुंगे, मुक्ताईनगरचे सचिन जैन, यु. पी. पाटणकर आदी उपस्थित होते.



विविध योजनांचा घेतला आढावा
या आढावा बैठकीत आमदार सावकारे यांनी भुसावळ शहरातील अमृत अभियान अंतर्गत राबविण्यात येणारी पाणीपुरवठा योजना, वरणगाव येथील महाराष्ट्र सूवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गतची पाणीपुरवठा योजना, खडका येथील जलस्वराज्य टप्पा दोन अंतर्गत योजना, कंडारी व साकेगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत तसेच 81 गावांच्या ओडीए योजनांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत शहरातील अमृत योजनेच्या कामांना गती द्यावी, अद्यापपर्यंत एकही जलकुंभ साकारले गेले नाही. तर दुसरीकडे पाईप लाईन टाकण्यासाठी खड्डे खोदले जातात, नंतर ते व्यवस्थित बुजवले जात नाहीत. निविदेनुसार खड्डे बुजवून जसा रस्ता होता तसा तयार करावा, असे असतानाही हे काम होत नसल्याने नगारिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा आमदार सावकारेंनी मांडला. संबधीत ठेकेदार जैन इरीगेशनचे जबाबदार अभियंता व अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हते. असेही सांगण्यात आले.
खडक्याची योजना अंतीम टप्प्यात
खडका येथील पाणीपुरवठा योजना आता अंतीम टप्प्यात आहे. सध्या चाचणी सुरु आहे. एका भागात कमी दाबाने पाणी मिळते, पाईपलाइनमध्ये काही बदल करुन ती लवकरच कार्यान्वित होईल. तर साकेगाव व कंडारी योजनेचा डीपीआर तयार केला जात आहे. ओडीए योजनेचे रेल्वे रुळांजवळील काम परवानगीमुळे रखडले आहे. आदी मुद्यांवरही चर्चा झाली.

