पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपीचे पलायन : धुळ्यातील घटना : तासाभराने आवळल्या मुसक्या
धुळे : पोस्कोच्या गुन्ह्यातील संशयीताने जिल्हा कारागृहाच्या छतावरून पलायन केल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली मात्र तासाभराच्या अंतराच आरोपीला अटक करण्यात यश आले. अर्जुन रंगनाथ आव्हाड (19, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
धुळे शहर परीसरातील रहिवासी अर्जुन आव्हाड यास बाल लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मंगळवारी सकाळपासून कारागृहात आरोपी व कैदींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रम सुरू असताना आरोपींना कोठडीतून आवारात आणण्यात आले. यावेळी अचानक आव्हाड याने बॅरेक क्रमांक दोनच्या शौचालयाच्या छतावरुन उडी मारुन पळ काढला. ही घटना कळताच जिल्हा कारागृहात धावपळ उडाली.



तासाभरात आवळल्या मुसक्या
आरोपीला पकडण्यासाठी शहर पोलिस धावत असतानाच आरोपीदेखील पोलिसांना पाहून पळत होता मात्र पोलिसांनी आरोपीचा पाठलाग सोडला नाही. कॉलनी परीसरातील घरांच्या छतावरुन उड्या मारत पळणार्या अर्जुनला देवपूर परीसरातील सत्यसाईबाबा नगरातून पकडण्यात अखेर यश आले. धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांच्या पथकातील योगेश चव्हाण, निलेश पोतदार, कमलेश सूर्यवंशी, गुणवंत पाटील, किरण भदाणे आदींनी आरोपीला अटक केली.

