जळगावात मुदत संपलेले गाळे जि.प.बांधकाम विभागाने घेतले ताब्यात
जळगाव : जिल्हा परीषद मालकीच्या मुदत संपलेले 18 गाळे न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परीषद बांधकाम विभागाने गुरूवार, 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतले. शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील जिल्हा परीषद अल्पबचन भवनात असलेले 18 गाळे हे जिल्हा परीषद मालकीचे आहे. या गाळ्यांची 22 मार्च 2018 रोजी मुदत संपली होती. मुदत संपल्याने जिल्हा परीषद प्रशासनाने गाळे खाली करून दुकानाचे भाडे देण्यासाठी नोटीसही दिली होती. त्यानंतर तोंडी व लेखी माहितीही देण्यात आली. दरम्यान आता कोणताही करार अस्तित्वात नसल्याने बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवण्यात आलेल्या दुकाने सोडावे, असे नोटीसीत नमूदही केले होते. यासाठी जिल्हा परीषदेने पाठविलेल्या नोटीसाच्या विरोधात सर्व गाळेधारक जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान 17 जुलै 2019 रोजी न्यायालयाने निकाल देवून कायदेशिररित्या मार्गाने गाळे ताब्यात घेण्याचे आदेश केले आहे.
नियमाप्रमाणे कारवाई : मुख्य कार्यकारी अधिकारी
बेकायदेशीर दुकाने ताब्यात ठेवून आणि करार संपल्यापासून आजपर्यंतचा 5 पट दंडासह एकुण 1 कोटी 83 लाख 68 हजार 473 रूपयांचा दंड ठोठावला आहे. 25 डिसेंबर 2020 रोजी नोटीस बजावण्यात आल्यानंतर आता आज गुरूवारी 1 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजता पोलीसांच्या मदतीने नियमाप्रमाणे सर्व कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी.एन. पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, कार्यकारी अभियंता नंदकुमार पवार, गटविकास अधिकारी एस.बी.सोनवणे, जिल्हा परीषदेचे कायदेशीर सल्लागार अॅड.हरुल देवरे, कर्मचारी व पोलिस बंदोबस्त यांच्यासह गाळे ताब्यात घेण्यात आले.



