सार्वजनिक मंडळांसाठी चार फुटी गणेश मूर्तीचे बंधन
रावेर : पोलीस ठाण्यात आगामी सण-उत्सवासंदर्भात पोलीस पाटील तसेच महिला दक्षता कमेटीची बैठक झाली. पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांची उपस्थिती होती. सार्वजनिक मंडळांसाठी चार फुटी तर घरगुती गणपतीसाठी दोन फुटी मूर्ती बसवण्याचे शासन निर्देश असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
गर्दी टाळण्यासाठी स्वच्छता पाळण्यावर द्यावा भर
मूर्तीचे नजीकच्या कृत्रिम स्थळी विसर्जन करावे, उत्सवासाठी देणगी स्वेच्छेने दिल्यास स्वीकारावी, आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन करावे, स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करावे, आरती, भजन, कीर्तन, अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादींद्वारे करावी, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच गणपती आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नये, अशा सूचना प्रसंगी देण्यात आली.



बकरी ईदला नमाज पठण घरीच करावे
बकरी ईदची नमाज मस्जिद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरीकांनी आपापल्या घरीच अदा करावे तसेच शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी, असे आवाहन प्रसंगी करण्यात आली तसेच ईदनिमित्त कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमू नये, गर्दी करू नये व शासनाचे परिपत्रकाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रसंगी पोलीस उपअधीक्षक पिंगळे व निरीक्षक वाकोडे यांच्या वाढदिवसानिमित्तप्रत्येक पोलीस पाटील, दक्षता कमिटी सदस्या यांना प्रत्येकी एक झाड देऊन ते जगवण्याबाबत आवाहन करण्यात आले.

