अवैध वाळू वाहतूकदाराची कोतवालांना शिविगाळ : एकाविरोधात गुन्हा
यावल : तालुक्यातील अवैध वाळु तस्करांनी सर्वत्र थैमान घातले असून सोमवारी पुन्हा एका कर्मचार्यावर अवैध वाळू वाहतूकदाराकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सांगवी बुद्रुक गावाजवळील ज्योती विद्यामंदीर या शाळासमोर सायंकाळी सहा-साडेसहा वाजेच्या सुमारास भालशीव येथील कोतवाल हरीष चौधरी गस्ती पथकावर शासकीय कर्तव्य पार पाडत असतांना या ठिकाणी निलेश चैत्राम कोळी (रा.भालशीव, ता.यावल) हे निळ्या रंगाच्या स्वराज कंपनीच्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये वाळूची वाहतूक करताना आढळल्याने पथकाने ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र संशयीताने ते थांबवल्याने पथकाने पाठलाग केल्यानंतर सांगवी बु.॥ गावापासुन तीन किलोमीटर लांब अंतरावर वाळूचा उपसा करीत शिवीगाळ करीत धमकी दिली. याबाबत कोतवाल हरी मोहन चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून ट्रॅक्टर चालक निलेश चैत्राम कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, हवालदार लक्ष्मण देवरे, पोलीस अंमलदार संजय सपकाळे करीत आहेत.




