भुसावळातील पथदिवे सुरू न केल्यास पालिकेसमोर कंदील लावून आंदोलन करणार : बबलू बर्‍हाटे


भुसावळ : भुसावळ शहरात नगरपालिका, महावितरण व पथदिव्यांचे कंत्राट घेतलेल्या ईएसएल कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे भर दिवसा अनेक ठिकाणी पथदिवे सुरूच होते. याबाबत अनेक वेळेस महावितरण, नगरपालिका प्रशासनास तक्रारी भुसावळ शहर शिवसेनेतर्फे करण्यात आल्या होत्या. परीणामी गुरूवारी कन्झ्युमर लाइनवरून वीज जोडणी केलेली असल्याने महावितरण अधिकार्‍यांनी थेट पथदिवेच काढून घेतल्याने नागरीकांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. भुसावळ शहरातील पथदिवे वेळेत सुरू आणि वेळेत बंद न झाल्यास शिवसेना पालिका कार्यालयासमोर कंदील लावून आंदोलन छेडेल, असा इशारा शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी दिला आहे.

नागरीकांना नाहक मनस्ताप
शहरातील 50 पेक्षा जास्त गल्ल्या अंधारात आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी भुसावळ शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी नगरपालिकेचे वीज अभियंता सुरज नारखेडे आणि ईएसएल कंपनीच्या कर्मचार्‍यांची भेट घेतली. समन्वयातून हा प्रश्न मार्गी लावून पथदिवे पुन्हा सुरू करावे, नवीन स्ट्रीट लाईट लाईनसाठी नियोजन करावे, शक्य असल्यास सर्व ठिकाणी टाइमर बसवावे अश्या सूचना बर्‍हाटे यांनी अधिकार्‍यांना दिल्या. उपशहर संघटक नबी पटेल, विक्की चव्हाण यांनी घडलेला प्रकार अधिकार्‍यांच्या समोर मांडला.




तर कंदील लावून आंदोलन करणार
भुसावळ शहरातील पथदिवे वेळेत सुरू आणि वेळेत बंद न झाल्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, कार्यलयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, उपतालुका प्रमुख पप्पू बारसे व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ नगरपालिकेच्या समोर कंदील लावण्याचे आंदोलन केले जाईल, असे बबलू बर्‍हाटे यांनी कळविले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !