शेती शिवारात वन्यप्राण्यांचा उपद्रव : उपाययोजनांची मागणी
शिंदी : परीसरातील मोंढाळा, शिंदी, वेल्हाळे, विचवा, मानमोडी या गावांच्या शेत-शिवारात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर शेती शिवारात पेरणी करण्यात आलेल्या पिकांना नष्ट करीत असल्याने वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. कोरडवाहू शेती शिवार क्षेत्र म्हणून या परीसरात पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते. रब्बी हंगाम या भागात पाहिजे तेवढ्या प्रमाणावर नसतो. विहिरीला चार महिन्यांचे पाणी पुरेल तरच रब्बीचा गहू, हरभरा काही प्रमाणात या भागात होतो. कोरडवाहू क्षेत्र असलेले शेती शिवार म्हणून परीसराची ओळख आहे. परीसरात आधीच पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांमोर उभे राहिले आहे. जवळपास दहा दिवसांपासून पावसाचा एकही थेंब पडलेला नसल्याने कोवळे अंकुर करपण्यास सुरुवात झाली आहे.
शेतकरी संकटात : वनविभागांकडून उपाययोजना हव्यात
येत्या तीन-चार दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे गंभीर संकट या परीसरातील शेती शिवारावर ओढवण्याची भीती आहे. कपाशी, उडीद, मूग, ज्वारी अशी पेरणी या भागात करण्यात आली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने पिकांचे कोंब जळण्यास सुरुवात झाली असून काही प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव जाणवतो. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट आजच उभे राहिले असताना वन्य प्राणी सुद्धा पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके नष्ट करीत आहेत. शेत शिवारात हरीण, नीलगाय, रानडुकरे यांचे कळप उगवण झालेली पिके नष्ट करीत आहेत. शेतकरी दिवसभर मेहनत करीत असल्यामुळे रात्री रखवाली करू शकत नाही त्यामुळे वन्य प्राण्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी वनविभागाने वनक्षेत्राला कुंपण करावे तसेच महावितरण विभागाने शेती शिवाराला वीजपुरवठा 24 तास उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



