मसाका भाडेतत्त्वावर देण्याच्या विषयाला ऑनलाईन वार्षिक सभेत मंजुरी
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार शिरीष चौधरी
फैजपूर : फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा विषयाला रविवारच्या ऑनलाईन सभेत मंजुरी मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून कारखाना बंद असल्याने कामगारांची देणी थकली असून संचित तोट्यात सातत्याने वाढ होत असल्याने त्या संदर्भात एकमताने हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी प्रसंगी दिली.
शेतकर्यांचे भविष्य उज्वल कराव्यात : सभासदांची भावना
सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन होते. काही सभासदांनी ऑनलाइन सभेतील चर्चेत सहभाग नोंदवत आजही मधुकर कारखान्यावर विश्वास असल्याचे सांगत आता ऊस लावून ठेवला असून भूतकाळाचा विचार न करता वर्तमानाचा विचार करून कारखाना सुरू करा व शेतकर्यांचे भविष्य उज्ज्वल करावे, अशी भावना व्यक्त केली. ऑनलाईन सभेत विषय पत्रिकेवरील सर्व दहा विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यात सर्वात महत्त्वाचा व गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला कारखाना व आसवनी प्रकल्प भाडेतत्त्वावर अथवा सहयोगी, भागीदारी तत्वावर देऊन तो सुरू करण्याच्या विषय क्रमांक नऊला सर्वांनी मंजुरी दिली.



देणी प्रचंड वाढली : चेअरमन महाजन
चेअरमन शरद महाजन व संचालक नरेंद्र नारखेडे यांनी कारखान्याविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले की, दोन वर्षापासून कारखाना बंद असून प्रचंड आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. शेतकर्यांची एफ.आर.पी.ची रक्कम व अन्य देणी थकली आहे. त्यात दोन वर्षापासून निसर्गाचाही असहकार आहे त्यामुळे संचित तोटा 103 कोटींवर जाऊन पोहोचला आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी भाडेतत्वा कारखाना देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी साखर आयुक्तांच्या मार्गदर्शक तत्वानुसार लेखा परीक्षण व आर्थिक रोल मॉडेल तयार करणे या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून वार्षिक सभेची मंजुरी मिळाल्यावर या विषयाला चालना मिळेल व भविष्यात पूर्ण शक्तीने कारखाना सुरू करण्याच्या कार्याला वेग देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
चेअरमन व आमच्यात मतभेत नाही : आमदार चौधरी
चेअरमन शरद महाजन व आमचा पक्ष वेगळा असला तरी आमच्यात कुठलाच बेबनाव अथवा मतभेद नाही, असे आमदार शिरीष चौधरी यांनी सुरुवातीला स्पष्ट करत आमच्या वाड-वडिलांनी सुरू केलेला प्रकल्प जिवंत ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे त्यापासून आम्ही पळ काढणार नाही, असेही ते म्हणाले. पक्ष वेगळा असला तरी कारखान्याच्या हितासाठी आम्ही एकत्र आहोत. केंद्र सरकारने सहकार विभाग नुकताच सुरू केला आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सर्वांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्याची गरज
माजी आमदार अरुण पाटील यांनी बाळासाहेब मधुकरराव चौधरी व दादासाहेब जे.टी.महाजन यांनी ज्या ध्येयधोरणतून कारखाना सुरू केला त्या ध्येयापासून दूर न जाता सर्व घटकांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली. जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी ज्या माध्यमातून प्रकल्प लवकर सुरू होईल त्यावर लक्ष केंद्रित करावे व येणारा हंगामात मधुकर कारखाना सुरू करावा, अशा सदिच्छा देत भाडेतत्वाच्या विषयाला पाठिंबा देताना दर्शविला. या ऑनलाइन बैठकीत विषयपत्रिकेवरील सर्व विषय यासह नफा-तोटा पत्रक स्वीकारणे, सभासद भाग भांडवल दहा हजाराहून पंधरा हजार करणे, सध्याचे मूल्यांकन कमी असल्याने पुनर्मूल्यांकन करणे, हंगाम 2019/20 च्या शिल्लक असलेल्या साखर साठ्याची विक्री करणे या विषयांना मंजुरी देण्यात आली.
यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीला माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा बँक संचालक गणेश नेहते, कामगार युनियनचे अध्यक्ष किरण चौधरी, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांच्यासह सर्व संचालकांची उपस्थिती होती. कार्यकारी संचालक शंकर पिसाळ यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. प्रभारी मुख्य लेखाधिकारी रत्नदिप वायकोळे यांनी मागील सभेचे इतिवृत्त मांडले मांडले. आभार व्हाईस चेअरमन भागवत पाटील यांनी माने.
भाडे तत्वाच्या निर्णयाबाबत कार्यकर्त्यांचे निवेदन
शेतकरी व कामगारांच्या हितासाठी भाडेतत्वाच्या या निर्णयाला सर्वांची संमती मिळाल्यानंतर जे ही प्रस्ताव सक्षम असतील या प्रस्तावाची शहानिशा करून आमदार शिरीष चौधरी यांना विश्वासात घेऊनच चेअरमन व संचालक मंडळ यांनी निर्णय घ्यावा. संचालक मंडळाने आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विजय संपादन केल्यानंतर कारखान्याची परीस्थिती व आता सात सात वर्षानंतरची परिस्थिती सभासदांच्या अवलोकनासाठी सविस्तर प्रसिद्ध करावी जेणेकरून शेतकरी व कामगार, सभासद यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण राहणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, नगरसेवक केतन किरंगे, चंद्रकांत भंगाळे, प्रसन्न महाजन, विकास पाटील, धीरज कुरकुरे, धीरज पाटील, अभय महाजन यांच्या स्वाक्षर्या आहे.

