मुक्ताईनगर हादरले : मेहुण्याने केली शालकाची निर्घृण हत्या !
मुक्ताईनगर : कौटुंबिक वादातून मेहुण्याने शालकाच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली. या घटनेत विशाल वामन ठोसरे (30, भुसावळ रोड, कोर्टाजवळ, मुक्ताईनगर) या तरुणाचा मृत्यू झाला असून हा खून मयताचा मेहुणा विजय सावकारे याने केल्याचा दाट संशय आहे. पोलिसांचा त्या दृष्टीने तपास सुरू असून पसार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
मेहुण्यावर खुनाचा संशय
भुसावळ रस्त्यावर विशाल ठोसरे हा युवक वास्तव्याला होता. त्याच्या बहिणीचे सुमारे चार वर्षांपूर्वी चुंचाळे (ता. यावल) येथील विजय सावकारे याच्याशी लग्न झाले मात्र यानंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद झाल्यानंतर अलीकडेच सलोखा होऊन त्याची बहिण सासरी नांदत गेल्याचे समजते. गुरुवारी रात्री विजय सावकारे हा सासूरवाडीला आला व येथे त्याने गोंधळ घातला मात्र हा वाद मिटल्यानंतर विशाल ठोसरे हे आपल्या कुटुंबियांसोबत झोपले होते. शुक्रवारी पहाटे विशाल ठोसरे यांच्या आईला जाग आली असता त्यांना आपल्या मुलाच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घातल्याचे दिसून आल्याने कुटुंबियांनी मोठा आक्राशे केला. याचवेळी विजय सावकारे हे घरात आढळून न आल्याने त्यांनीच हा खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.



