जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हाणामारी
जळगाव : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समितीच्या कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी हाणामारी झाल्याने खळबळ उडाली. जामनेर तालुक्यातील वाकोद येथील तरूणीचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील तरूणाशी चार महिन्यांपुर्वी झाल्यानंतर कौटुंबिक वादातून उभयंतांमध्ये दोन महिन्यातच खटके उडाल्याने महिला दक्षता समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी दोन्ही गटातील मंडळी पोलीस अधिक्षक कार्यालयात जमली होती. दक्षता समितीतील कामकाज आटोपल्यानंतर बाहेर पडल्यानंतर दोन्ही कुटुंबियांमधील शाब्दीक वाद हाणामारीवर पोहोचला. हाणामारीत फायटरसारख्या वस्तूचा देखील वापर झाला. हा प्रकार घडल्यानंतर येथील पोलिस कर्मचार्यांनी धाव घेतली वाद मिटविला. या हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले आहे. दोघांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.



