यावल पोलीस ठाण्यातून पळवलेले ट्रॅक्टर कारवर धडकले : ट्रॅक्टर चालक जखमी


यावल : महसूल विभागाच्या पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करणारा ट्रॅक्टर गुरुवारी सायंकाळी येथील पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात उभा असलेला ट्रॅक्टर दोन तासाच्या अवधीनंतर भालशीव येथील श्रीराम सुरेश सोनवणे याने सुसाट वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. हे ट्रॅक्टर रस्त्याने जात असलेल्या अंत्ययात्रेतील गर्दीत शिरले मात्र सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही मात्र भुसावळ टी पॉइंटवर एका कारला धडक बसल्याने कारचे सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले तर सुंदरनगरी भागात पोलिसांनी ट्रॅक्टर अडविले. पोलिसांना पाहून चालक पळून जात असताना तो जमिनीवर पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्यास येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर जळगाव येथे रवाना करण्यात आले.

ट्रॅक्टर पळवल्याने उडाली खळबळ
महसूल विभागाच्या पथकाने अवैध गौण खनिज मोहिमेंतर्गत तलाठी दीपक गवई व व त्यांच्या पथकाने ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 ए.एन.1216)हे गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात जमा केले होते. त्यातच सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास भालशीव येथील श्रीराम सुरेश सोनवणे याने अचानक येऊन ट्रॅक्टर सुरू करून सुसाट वेगाने आवारातून पळवून नेले व याचवेळी कर्तव्यावर हजर असलेले ठाणे अंमलदार युनुस तडवी, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहा.निरीक्षक् अजमल पठाण, पोलीस कॉन्स्टेबल संजय देवरे, राहुल चौधरी, राजेश वाडे यांनी ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला असता एका अंत्ययात्रेतून चालकाने सुसाट वेगाने ट्रॅक्टर नेले मात्र अंत्ययात्रेतीत सहभागी लोक वेळीच बाजुस झाल्याने मोठी दुर्घटना टळली. नंतर हे ट्रॅक्टर भुसावळ टी पॉईंट वर समोर चालणार्‍या कार (एम.एच.19 सी.एफ.3839) ला मागून धडकले व सुंदर नगरीमार्गे पळून जात असताना पोलिसांनी त्यास रोखले. पोलिसांना पाहून ट्रॅक्टरवरून उतरून चालक पळ काढत असताना जमिनीवर जोरदार पडल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी ठाणे अंमलदार युनूस तडवी यांच्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल नितीन चव्हाण करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !