मुक्ताईनगरात दूषित पाणीपुरवठ्याविरोधात प्रहारचे आंदोलन
मूलभूत सुविधा पुरवण्यास अकार्यक्षम असलेल्या नगरपंचायतीचा डॉ.विवेक सोनवणे यांनी केला निषेध
मुक्ताईनगर : शहरवासीयांना होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी 11 वाजता प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत नगरपंचायतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नगरपंचायतीची 2017 अखेर स्थापन होवून आज चार वर्ष उलटले मात्र त्यानंतरही प्रशासनाद्वारे कोणत्याही मूलभूत अत्यावश्यक सोयी-सुविधांचा लाभ जनतेला होत नसताना दुसरीकडे नगरपंचायतीद्वारे घरपट्टी पाणीपट्टी व इतर करांमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली. नागरीकांना शुद्ध पाणीपुरवठा करणे नगरपंचायतीची जवाबदारी असतानाही ही जबाबदारी पार पाण्यात न.पा. प्रशासन पूर्णपणे अयशस्वी झाल्याने सोमवारी आंदोलन करण्यात आले.
शुद्ध पाणीपुरवठा न केल्यास तीव्र आंदोलन
नगरपंचायत प्रशासनाने मागण्यांचा सकारात्मक विचार करून शहरवासीयांना शुद्धव निर्जंतूक पाणीपुरवठा करावा अन्यथा व्यापक प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेचे डॉ.विवेक सोनवणे, विलास पांडे, चंद्रकांत वंजारी, संतोष राजपूत, संदीप इंगळे, अनिकेत सोनार, ऋषिकेश पाटील, बापू मेढे, उत्तम जुमळे यांनी दिला आहे. या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना , एमआयएम, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा , मायनॉरीटी कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, लहुजी क्रांती सेना व इतर शहरवासीयांनी समर्थन दिले.



