बोरखेडा खुर्द गावात दूषित पाणीपुरवठा
यावल : तालुक्यातील बोरखेडा खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने केला जाणारा पाणीपुरवठा दूषित असल्याची तक्रार आहे. गुरूवारी नळाद्वारे पक्षांचे पंख व किडे आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी हे पंचायत समितीत दूषित पाणीपुरवठ्यासंर्दभात तक्रार केली. तत्काळ गावातील पाण्याची समस्या न सोडवल्यास नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने घ्यावी दखल
बोरखेडा खुर्द, ता.यावल या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने केला जाणारा पाणीपुरवठा हा दूषित होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी पंचायत समितीत निवेदनाव्दारे केली आहे. गावातून बादलीत पाणी आणत यासंदर्भातील निवेदन त्यांनी कक्ष अधीक्षक जी.एम.रिंढे यांच्याकडे दिले. गुरुवारी गावाला झालेला पाणीपुरवठा दूषित होता व त्यामध्ये पक्षांचे पंख होते, मासाचे तुकडे होते व बारीक जंतू पाण्यामध्ये आढळून आले. याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार केली मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दूषित पाणी एका बादलीत भरून पंचायत समितीत आणण्यात आले व कशा पद्धतीचे पाणी आले याची तक्रार करण्यात आली. एकीकडे कोरोना विषाणूचे संकट असतांना अशा पद्धतीने दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात आली. निवेदन देताना जमशेर शब्बीर तडवी, जहांगीर गंभीर तडवी, सुलेमान रहेमान तडवी, युनूस दगडू तडवी, अजित मजीत तडवी, राजू महारु तडवी आदींची उपस्थिती होती.



