द्वारकाई व्याख्यानमाला खान्देशातील सांस्कृतिक मानदंड !
पुण्याचे कवी देवा झिंजाड यांचे गौरवोद्गार ; स्वरचित कवितांनी रसिक अंतर्मुख
भुसावळ : ‘आई जग दावणारी आई हंबरणारी गाय, शीळपाख खाऊनही देई लेकरांना साय’, ‘बाळा मला भूक नाही असं आई म्हणायची, आमच्या टोपल्यात तव्हा अर्धी भाकर असायची’ अशा काळजाला भिडणार्या स्वरचित गेय कविता सादर करून पुण्याचे ‘गदिमा’ पुरस्कारप्राप्त कवी देवा झिंजाड यांनी रसिकांच्या डोळ्यात आसवांचं गोकुळ उभं केलं. भुसावळ येथील जय गणेश फाउंडेशन आयोजित ऑनलाइन द्वारकाई व्याख्यानमालेत त्यांनी कविता सादर केल्या. द्वारकाई व्याख्यानमाला खान्देशातील सांस्कृतिक मानदंड असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणार्या या ऑनलाइन व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प कवी झिंजाड यांनी ‘आई-बापाच्या कविता’ या विषयावर रविवारी गुंफले.
‘द्वारकाई व्याख्यानमाला ही खान्देशातील सांस्कृतिक मानदंड
‘द्वारकाई व्याख्यानमाला ही खान्देशातील सांस्कृतिक मानदंड आहे. मानवी मनाची सांस्कृतिक मशागत, मेंदू नांगरण्याचे शाश्वत काम या चळवळीच्या माध्यमातून होते आहे. जन्मदात्री मातेचे स्मरण करण्यासाठी पेटवलेला हा ललामभूत संस्कारयज्ञ समाजाला दिशा देणारा आहे, अशी भावना कवी झिंझाड यांनी सुरुवातीला व्यक्त केली. त्यानंतर स्वरचित आठ ते दहा कविता व त्यांचा आशय संक्षिप्त स्वरुपात उलगडून सांगितला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरीक बापू मांडळकर हे होते. प्रास्ताविक उमेश नेमाडे यांनी केले. स्वर्गीय अरुण मांडळकर यांच्या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला सुरू असल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे यांनी केले. तंत्रसहाय्य पुणे बालभारतीचे सदस्य डॉ. जगदीश पाटील व कोटेचा महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गिरीश कोळी यांचे लाभले. यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे पदाधिकारी व नियोजन समितीने परिश्रम घेतले.



कवितांना संघर्ष, वास्तवाचा सुगंध
कवी देवा झिंजाड यांनी ‘ऋण आईच्या गर्भाचं ह्या जन्मीच फेडावं, आई-बापाच्या सावलीत हिरव्या कोंबानं वाढावं’ ही कविता सर्वप्रथम सादर केली. त्यानंतर ‘वाटण्या’ कविता खर्जातील आर्जवात म्हटली. ‘एक आईवर गेला एक बापावर गेला, वाटणीच्या टाइमाला लेक बायकोवर गेला’ या ओळीतून त्यांनी आई-बापांच्या नशिबी आयुष्याच्या सायंकाळी आलेली वेदना मांडली. एकंदरीत त्यांच्या सर्व कविता या सभोवतालचं कष्टकरी समाजाचं जगणं, भोगण्याचं वास्तव व संघर्ष मांडणार्या अशाच होत्या.
‘फुलं’ कवितेने डोळ्यात आणलं पाणी
सासूरवास होणारी लेक आपल्या दूरदेशी असलेल्या आईला पत्र पाठवून अंतर्मनाच्या भावना कशी व्यक्त करते? हे त्यांनी ‘फुलं’ या कवितेतून मांडले. ‘मुंंडावळ्यांच्या फुलांचा स्पर्श शेवटचा ठरला गं आई, त्यानंतर फुलांशी माझं नातं तुटले गं आई’ या ओळी ऐकताना ऑनलाइन रसिकांच्या मोबाइलचे स्क्रीन व हातरुमालाच्या घड्या आसवांनी ओल्या झाल्या नसतील तरच नवल. आयुष्याची अखेरची घटका मोजणार्या आईवरची कविता सादर करताना कवी झिंजाड यांचा हुंदका दाटून आला.
चंदनशिवे उद्या द्वितीय पुष्प गुंफणार
द्वारकाई व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प मंगळवार, 27 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता कवठेमहांकाळ (जि.सांगली) येथील दंगलकार नितीन चंदनशिवे हे गुंफतील. ‘वेदनेचा तळ शोधणारी कविता’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

