दीपनगरचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची बदली
मुख्यालयातून विजय राठोड यांची भुसावळ येथे वर्णी
भुसावळ : दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची अवघ्या आठ महिन्यातच कोराडी औष्णिक केंद्राच्या मुख्य अभियंतापदी बदली झाली आहे. त्यांच्याकडे कार्यकारी संचालक पदाचा प्रभारी पदभारदेखील दिला आहे. तर त्यांच्या जागी दीपनगरात मुख्यालयातील विजय राठोड यांची वर्णी लागली आहे.
दीपनगर औष्णिक केंद्रात नोव्हेंबर महिन्यात प्रकाश खंडारे यांनी मुख्य अभियंता पदी पदभार घेतला होता. अवघ्या आठ ते नऊ महिन्यांत त्यांची बदली झाली आहे. महानिर्मिती प्रशासनाने त्यांची कोराडी 660 मेगावॅट प्रकल्पाच्या मुख्य अभियंतापदी नियुक्ती केली. सोबतच त्यांच्याकडे प्रभारी कार्यकारी संचालक संचलन (दोन) या पदाचा कारभार राहणार आहे. तर खंडारेंच्या जागी आता महानिर्मितीच्या मुंबई मुख्यालयातील आरसी विभागातील विजय राठोड यांची बदली झाली आहे. लवकरच ते दीपनगर मुख्य अभियंता पदाचा पदभार स्वीकारतील. खंडारे यांच्या कार्यकाळात दीपनगर केंद्राला शिस्त लागली होती. ही शिस्त टिकवून ठेवण्याचे आव्हान राठोड यांच्यासमोर असणार आहे.




