कनिष्ठ प्राध्यापकांच्या समस्यांविषयी आमदार डॉ.सुधीर तांबे यांची शिक्षण आयुक्तांशी चर्चा
भुसावळ : राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी तसेच शिक्षण संचालक टेमकर यांच्याशी पुण्यात नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे विधान परीषद सदस्य आमदार डॉ.सुधीर तांबे, शिक्षक आमदार विक्रम काळे व आमदार जयंत आजगावकर यांच्या उपस्थितीत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रातल्या प्रलंबित समस्यांबाबतीत बैठक घेण्यात आली. आयुक्तांच्या स्तरावर जे काही प्रश्नांचे निराकरण करून राज्याच्या शिक्षण विभागाकडे तत्काळ अहवाल पाठवावा, असा आग्रह धरण्यात आला.
जुन्या पेन्शन योजनेच्या लाभासह विविध मागण्यांबाबत निवेदन
विशेषतः 2020-2021 या वर्षातील अंशदायी अनुदान टप्प्यावर आलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक 20 टक्के 40 टक्के अनुदानाचा टप्पा देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, विशेषतः कनिष्ठ महाविद्यालयाचे अनुदानित व विनाअनुदानित तुकड्यांवर निर्माण झालेल्या वाढीव पदांना तत्काळ मान्यता द्यावी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर 2011-12 नंतर वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे निर्माण झालेली पायाभूत पदे मंजूर करण्याबाबत कार्यवाही तत्काळ करावी, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाची आयटी विषयाच्या कनिष्ठ प्राध्यापकांना अनुदान टप्पा तत्काळ मंजूर करावा तसेच सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांचा प्रोव्हिडंड फंड तत्काळ अदा करावा, बीडीएस संकेतस्थळ शासनाने बंद करू नये जेणेकरून सेवानिवृत्त कर्मचार्यांना प्रोव्हिडंट फंड तत्काळ मिळेल अशी व्यवस्था करावी व 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत कार्यरत असणार्या अनुदानीत बिगर अनुदानीत अंशतः अनुदानित कर्मचार्यांना जरी मान्यता उशिरा मिळाली असली तरी अशांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व 2005 नंतरच्या कर्मचार्यांना देखील जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावा या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली. राज्य कनिष्ठ महासंघाने व जळगाव जिल्हा कनिष्ठ प्राध्यापक संघटनेने वेळोवेळी आमदार डॉ.सुधीर तांबे यांना निवेदन दिले. त्यानुसार विधान परीषद सदस्य आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी ही बैठक घेतली. कनिष्ठ प्राध्यापक संघटनेने या बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुनील सोनार, सचिव प्रा.शैलेश राणे, कार्याध्यक्ष नंदन वळींकर, प्रा.सुनील पाटील, प्रा.सुनील गरुड, माजी अध्यक्ष डी.डी.पाटील यांनी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्याकडे केली होती.



