शिक्षण विभागातील उच्चपदस्थ रीक्त जागांवर पीएच.डी.धारक शिक्षकांची नियुक्ती करावी
मुंबईत शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा : राज्यात शेकडो पीएच.डी. धारक शिक्षक
भुसावळ : संपूर्ण राज्यभरात सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये शेकडो पीएच.डी.धारक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांनी अध्यापनाबरोबरच संशोधन केले असल्याने त्यांच्या गुणवत्तेचा उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून त्यांची नियुक्ती शिक्षण विभागातील उच्चपदस्थ रिक्त जागांवर करण्यात यावी, अशी मागणी पीएच.डी.धारक शिक्षकांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात नुकतीच मुंबई येथे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.
यांच्या शिष्टमंडळाचा समावेश
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या चर्चेत आमदार डॉ.बालाजी किणीकर (कल्याण), महेश मोरे (ठाणे), ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण) यांच्यासह पीएच.डी.धारक शिक्षक डॉ.राजेश पावडे (नांदेड), डॉ.जयश्री मोरे (ठाणे), डॉ.जगदीश पाटील (जळगाव), डॉ.बालाजी समुखराव (लातूर) यांच्या शिष्टमंडळाने सहभाग घेतला. राज्यातील विविध शाळांमध्ये कार्यरत पीएच.डी. धारक शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाने मागवावी आणि धोरणात्मक व प्रशासकीय निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पीएच.डी.धारक शिक्षकांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाईल, असे आश्वासन यावेळी शिक्षणमंत्री ना. गायकवाड यांनी दिले. यावेळी शिष्टमंडळातर्फे त्यांना निवेदन सादर करण्यात आले.



विधानसभेत तारांकित प्रश्न
शालेय शिक्षण विभागातील रीक्त असलेल्या पदांवर पीएच.डी. धारक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, या संदर्भातील तारांकित प्रश्न आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मांडला होता. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी उल्हास कावरे यांनी विभागीय आयुक्तांकडून माहिती मागवली आहे तसेच दोन वर्षांपूर्वी पीएच.डी.धारक शिक्षकांची नावे मागवण्यात आली होती परंतु त्यावर काय कार्यवाही झाली हे अद्यापपर्यंत कळू शकले नाही.

