दरोड्यातील संशयीत आरोपी मुकेश भालेरावचा भुसावळात आत्महत्येचा प्रयत्न
पोलीस ठाण्यातील शौचालयात जावून खिडकीच्या काचेने अंगावर स्वतःच केले वार
भुसावळ : यावलमधील जगदीश कवडीवाले यांच्या सराफा दुकानावर टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणातील संशयीत आरोपी मुकेश प्रकाश भालेराव यास भुसावळ तालुका पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याने तालुका पोलीस ठाण्यातील शौचालयात जावून अंगावर धारदार काचेने वार करून घेतल्याची घटना शुक्रवार, 30 जुलै रोजी 7.40 वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी संशयीत मुकेश भालेरावविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
आत्महत्येच्या प्रयत्नाने शहरात खळबळ
बाजारपेठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत मुकेश प्रकाश भालेराव (26, बोरावल खुर्द, ता.भुसावळ, ह.मु.राहुल नगर, तापी नदी पुलाजवळ, भुसावळ) यास यावल पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर तालुका पोलिसांनी त्यांच्याकडील गुरनं.53/2021, भादंवि 394, 341, 34 मध्ये शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेवून अटकेची प्रक्रिया सुरू केली असताना संशयीताने शौचालयात जावयाचे असल्याचे सांगत तालुका पोलीस ठाण्यातील खिडकीच्या तुटलेल्या काचेच्या सहाय्याने पोटाच्या डाव्या व उजव्या बाजूस तसेच छातीवर व दोन्ही मांडीवर दुखापत करून आत्महत्येचा प्रयत्न केला तसेच काचेचा तुकडा शौचालयाच्या भांड्यात फेकून दिला. या प्रकारानंतर लागलीच संशयीत भालेराववर भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले. भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार प्रवीण युवराज पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयीत मुकेश भालेरावविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.



