सावद्यातील बायोडिझेल पंप चालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तंबीनंतर प्रशासनाला आली जाग
सावदा : सावदा येथील फैजपूर रस्त्यावरील ट्रान्सपोर्ट मागे विनापरवानगी सुरू असलेल्या बायोडिझेल पंपावर महसूल प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वीच पंप सील करण्याची कारवाई करण्यात आली होती. आमदार चंद्रकांत पाटील यांनी बेकायदा पंप कुणाच्या आशीर्वादाने सुरू असल्याबाबत शिवाय महसूल प्रशासनाच्या साशंक भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या कार्यपद्धत्तीबाबत संताप व्यक्त केला होता. आमदारांनी व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीनंतर महसूल विभागातर्फे सावदा पोलीस स्टेशनला रावेर तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांच्या फिर्यादीनुसार पंप चालक निरज खेमचंद जेसवाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 27 जुलै 2021 ते 6 ऑगस्ट दरम्यान आरोपी निरज जेसवाणी यांनी कोणत्याही विभागाची परवानगी न घेता बायोडिझेल पंप सील असतानादेखील छुप्या पद्धत्तीने त्यातून डिझेल विक्री करून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहपास सहा.निरीक्षक देविदास इंगोले व सहकारी करीत आहेत.
दुसर्या पंपावर कारवाई का नाही ?
सावदा शहरात दुसरा आणखी एक बायोडिजेल पंप सुरू असून त्यांची तपासणी देखील झालेली नाही शिवाय त्यावर सुद्धा कारवाई का नाही? असा प्रश्न नागरीक आता उपस्थित करीत आहेत.



