हद्दवाढ झालेल्या क्षेत्रात लवकरच विकासकामे पूर्ण होणार
लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिता येवले यांची माहिती
सावदा : शहरातील नव्याने हद्दवाढ झालेल्या परीसरात लवकरात-लवकर कामे पूर्ण होणार असून याबाबतच्या सर्व प्रशासकीय व तांत्रिक मंजुर्या मिळाल्या असून काही कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे तर काही कामे ही निविदा प्रक्रियेवर असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिता येवले यांनी दिली. नगराध्यक्षा अनिता येवले यांनी दिलेल्या माहितीनुसारख, गेल्या दोन वर्षापूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याने शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला होता. त्याबाबत सावदा नगरपरीषद सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव झाला होता. त्यानुसार विकास कामांबाबत परीसरातील रस्ते, गटारी व पाणी पाईपलाईनबाबत निविदा प्रक्रिया काढून एका एजंन्सीला याबाबतचे सर्वेक्षण करुन निविदा तयार करण्यात आली. गेल्या महिनाभरापासून या परीसरातील कामांना काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे. खाजानगरात शुभारंभ सुध्दा झाला असून आता नव्याने हद्दवाढ योजनअंतर्गत सावदा नगरपालिका हद्दीतील सोमेश्वर नगर येथील गट नं. 575 मधील अंतर्गत रस्त्याचे खडीकरणाच्या 1 कोटी अठरा लाख पस्तीस हजार रुपयांच्या कामांना 15 जुलै 2021 रोजी मान्यता मिळाली आहे. तसेच याच भागात विशेष रस्ता योजनेंतर्गत प्राप्त अनुदानातून सोमेश्वर नगरामधील गट नं. 576 व 577 व 575 मधील काही भाग अंतर्गत रस्त्याचे खडीकरणासाठी एक कोटी 12 लाख 91 हजार रुपयांच्या कामांना 25 जुलै 2021 रोजी प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. याबाबत पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून कारवाई सुरू आहे.
पाणीपुरवठ्याची समस्या निघणार निकाली
सोमेश्वर नगर व पुढील भागातील काही भागामध्ये पाणी पुरवठ्याची समस्या ही कमी दाबाचा पुरवठा झाल्यामुळे कधी-कधी कमी पाणी-पुरवठ्याच्या समस्या उद्भवत असतात त्यासाठी नवीन पाईप-लाईन टाकणे आवश्यक आहे. याबाबत सुध्दा आम्ही पाठपुरावा केला असून हे काम मंजुराधीन आहे. त्याबाबत सुध्दा लवकरच पाठपुरावा करून पाणी समस्या सुध्दा सुटणार आहेत. शहरातील काही विकासकामांना सावदा न.पा.कडे सर्व यंत्रणा सक्षम असल्यावर सुध्दा शासनाने सावदा नगरपरीषदेला निधी दिला नसल्यावर सुध्दा आम्ही जलकुंभ तसेच शादीखाना हॉल व खंडेराव वाडी देवस्थान या कामांना नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव घेवून नाहरकत दिलेली आहेत. अश्या रीतीने सावदा येथे विविध विकासकामे जसे चांदणी चौक परीसरात व्यापारी संकुल व दत्तमंदिर पाताळगंगा जवळ बगीचा अशी विविध विकास कामे होत आहे.



