सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मागील वर्षापासून विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित
शिंदी, ता.भुसावळ : मागील वर्षी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने गणवेशाचे अनुदान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नाही त्यामुळे यंदाच्या गणवेशाच्या अनुदानासोबत मागील वर्षाच्या गणवेशाचे अनुदानही मिळावे, अशी मागणी ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी शेतमजूर पालकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य शिक्षण विभागाने तत्काळ घ्यावा निर्णय
प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांच्या यंदाच्या ऑनलाइन अभ्यासक्रमास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य स्थितीमुळे शाळेची घंटा वाजली नव्हती. यावर्षी सुद्धा शाळेची घंटा वाजलीच नाही. ज्या ठिकाणी सामान्य परीस्थिती आहे अशा ठिकाणी केवळ इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग सुरू आहेत. परीणामी मागील वर्षापासून सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शासकीय व जिल्हा परीषद अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्या सर्व मुली अनुसूचित जाती व जमातीची मुले तसेच दारीद्य्र रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश देण्यात येतो मात्र मागील वर्षापासून या वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले तरी विद्यार्थी या योजनेपासून वंचित आहेत.



शिक्षण विभागाकडून तत्काळ निर्णयाची अपेक्षा
मागील शैक्षणिक वर्षात शाळा सुरू नव्हत्या तरी ऑनलाइन तसेच दूरदर्शन व इतर शक्य त्या-त्या पर्यायांचा अवलंब करून शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत होते. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मागील वर्षी करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे ज्या पद्धतीने वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे मागील वर्षी गणवेशाचे पैसे खात्यावर जमा झाले असते तरी गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, दारीद्य्र रेषेखालील घटकातील पालकांना त्यातून दिलासा मिळाला असता आणि त्यांनी आपल्या पाल्यांना शालेय ड्रेस शिवून घेतला असता .त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला असता. शालेय ड्रेस परीधान केल्याने शाळेत असल्यासारखा त्यांना नक्कीच आनंद झाला असता. बहुसंख्य गोरगरीब पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने अगोदरच त्यांची पाल्य तसेच पालक आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य काय याबाबत विचारात दिसून येत असतात. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याचा निर्णय झाला होता मात्र ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत. एका ड्रेसचे तीनशे रुपये अनुदान मिळणार होते तेदेखील मिळाले नाही. यंदा सुद्धा शैक्षणिक सत्र सुरू होऊन सुमारे दोन महिने होत आले परंतु अजूनही या बाबतीत संभ्रम दिसून येतो. शालेय गणवेश यासाठी कापड द्यायचे की गणवेशाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करायची ? याबाबत राज्य शिक्षण विभागाकडून निर्णय लवकरात लवकर घेण्याची अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.
शाळा बंद मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू
शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण शक्य त्या त्या पर्यायांनी सुरू असल्याने मागील वर्षातील गणवेशाचे अनुदान सुद्धा मिळणे क्रमप्राप्त आहे ते अनुदान मिळणे हा विद्यार्थ्यांचा सर्व शिक्षा अभियान अंतर्गत एक प्रकारे हक्कच आहे त्यामुळे या वर्षाच्या अनुदाना सोबत मागील वर्षाचे सुद्धा गणवेशाचे अनुदान मिळावे, अशी अपेक्षा गोर-गरीब पालक वर्गातून ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.

