फैजपूर मंडळातील 227 सात बारा झाले तगाई बंडिंग मुक्त


फैजपूर : फैजपूर मंडळातील फैजपूर, न्हावी प्र.यावल, आमोदे, मारूळ, बोरखेडा बु.॥, विरोदे, पिंपरूड, वढोदे प्र.सावदा, हंबर्डी या गावातील 7/12 मध्ये असलेल्या इतर हक्कातील कालबाह्य नोंदी कमी करण्याबाबत विशेष मोहिम राबविण्यात आली. ही मोहिम 1 ऑगस्ट महसूल दिनी सुरू करण्यात आली. ज्या 7/12 वर जुने तगाई, बंडिंग, आयकट बोजे दाखल होते. हे बोजे हे शेतकरी यांना अडचणीचे ठरत होते. अश्या सर्व बोजांचा शोध तलाठी यांनी घेतला व शासन निर्णयानुसार फैजपूर- 4, न्हावी प्र.यावल- 178, बोरखेडा बु.॥- 39, विरोदे- 1, वढोदे प्र.सावदा- 1, पिंपरूड- 4 असे एकूण 227 सात बारावरील 7/12 मध्ये असलेल्या इतर हक्कातील तगाई, बंडिंग, आयकट बोजे या कालबाह्य नोंदी कमी करण्यात आल्या.

तलाठ्यांनी स्वतःच घेतला कालबाह्य नोंदीचा शोध
तगाई, बंडिंग, आयकट इत्यादी कर्ज हे शासनाने 1970-80 च्या कालखंडात शेती उपयुक्त कामासाठी वाटप केले होते. कालांतराने सदर कर्ज शासनाने माफ केले होते परंतु त्या कर्जाची नोंद आज रोजीही 7/12 वर शिल्लक होती. 7/12 मध्ये असलेल्या इतर हक्कातील तगाई, बंडिंग, आयकट बोजे या कालबाह्य नोंदी शेतकरी यांना खरेदी-विक्री, बँक लोण घेण्याकामी अडथळा ठरत होत्या. या मोहिमेचे वैशिष्ट म्हणजे यासाठी शेतकरी यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा अर्ज अथवा कागदपत्रे घेण्यात आलेले नाही. तलाठी यांनी स्वतच सदर कालबाह्य नोंदीचा शोध घेऊन फेरफार दाखल केले व मंडळ अधिकारी यांनी फेरफार प्रमाणित केले.




मोहिम यशस्वीसाठी यांचे परीश्रम
मोहिमेच्या यशस्वीतेसाठी फैजपूर मंडळ अधिकारी जे.डी.बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर तलाठी प्रशांत जावळे, आमोदे तलाठी एम.पी.खुर्दा, न्हावी प्र.यावल तलाठी लीना राणे, विरोदे तलाठी एच.डी.सांगोळे, आमोदे कोतवाल लिलाधर सपकाळे, फैजपूर कोतवाल तुषार जाधव, न्हावी कोतवाल बारी आदींनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !