दलित अत्याचाराच्या विरोधात संसदेवर 12 ऑगस्टला हल्लाबोल महामोर्चा
काँग्रेस अनु.जाती विभाग कार्यकारीणीची संसद घेराव पूर्व नियोजन आढावा बैठक
भुसावळ : देशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिपत्याखाली काम करणारे नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यापासून देशासह अनेक राज्यभरात विविध ठिकाणी दलित अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. दलित अन्याय, अत्याचाराच्या विरोधात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनु.जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे संसदेवर 12 ऑगस्ट 21 रोजी हल्लाबोल महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या संसद घेराव महामोर्चाचे पूर्व नियोजन करण्यासाठी काँग्रेस अनु.जाती विभागाचे प्रदेश समन्वयक भगवान मेढे यांच्या अध्यक्षतेखाली व जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ शहर काँग्रेस अनु.जाती विभागाची महत्वपूर्ण बैठक झाली.
हल्ला बोल मोर्चात सहभागाचे आवाहन
दलित विरोधी केंद्र सरकारला सडेतोड उत्तर देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, दलित संघटना व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी केले आहे. दरम्यान, या बैठकीला भगवान मेढे, विवेक नरवाडे, सुनील जोहरे, विजय तुरकेले, महेंद्र महाले, सुकदेव सोनवणे, मुकेश सपकाळे, अक्षय अंभोरे आदी उपस्थित होते.



