भुसावळात पोलीस पत्नीचे धूमस्टाईल मंगळसूत्र लांबविले
भुसावळातील शांती नगरातील घटना : धूम स्टाईल चोर्यांनी महिलावर्गात घबराट
भुसावळ : शहरातील जुन्या चोर्यांचा तपास लागत नसताना नव्या चोर्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धूम स्टाईल येत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवण्यात आल्याची घटना शहरातील शांती नगर भागात बुधवारी रात्री घडली. विशेष म्हणजे महिलेचे पती हे पोलिस कर्मचारी असल्याने या घटनेने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
धूम स्टाईल चोर्या वाढल्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचार्याची पत्नी पीठाच्या गिरणीवर बुधवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास जात असताना धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले. यावेळी महिलेने आरडा-ओरड करीत चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे पसार झाले. याबाबतची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आणि पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देऊन महिलेकडून भामट्याचे वर्णन जाणून घेतले. पोलिसांनी या परीसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, काही वर्षांपूर्वी भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने लांबविल्याची घटना घडली होती.



