लोहमार्ग पोलिसांच्या हातावर तुरी देत मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पसार


लहावीत रेल्वे स्थानकावरील घटना : ठाण्यातून घेतले होते ताब्यात

भुसावळ : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात ठाण्याहून ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीने लोहमार्ग पोलिसांच्या हातावर तूरी देत पलायन केल्याची घटना गुरुवारी रात्री नाशिकजवळील लहावीत रेल्वे स्थानकावर घडली. या प्रकरणी नाशिक लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

रेल्वे थांबताच आरोपीचे पलायन
भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल असून पोलीस तपासात चोरीतील मोबाईल बुलढाण्यातील एका इसमाकडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधिताची चौकशी केली असता त्याने हा मोबाईल बबलु दिनकर महाले (30, बुलढाणा) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी या संशयीताचा शोध सुरू केला. महाले हा ठाण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यास गुरुवारी दुपारी चौकशीकामी ठाण्यातून ताब्यात घेतले. डाऊन सेवाग्राम एक्स्प्रेसच्या इंजिनानंतरच्या विकलांग डब्यातून संशयीतासह पोलीस कर्मचारी दिवाणसिंग राजपूत, सतीश जोंजाड व प्रकाश डोंगरदिवे भुसावळकडे येत असताना गुरुवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास नाशिकजवळील लहावीत रेल्वे स्थानकावर गाडी थांबली असता त्याचवेळी संशयीताने बाहेर थुंकण्याच्या बहाण्याने कर्मचार्‍यांच्या तावडीतून पळ काढला. या प्रकरणी नाशिक लोहमार्ग पोलिसात दिवाणसिंग राजपूत यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात भादंवि 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पसार आरोपीविरोधात बुलढाणा तसेच बडनेरा येथेदेखील गुन्हा दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !