रावेरात पार्लर प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली विद्यार्थिनींची पिळवणूक


रावेर : तालुक्यातील सावखेडा येथील 41 गरीब विद्यार्थिनीची ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली रावेरच्या वात्सल्य ब्युटी पार्लर संस्थेने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार विद्यार्थिनीनी रावेर पंचायत समितीकडे केल्याने खळबळ उडाली आहे.

प्रशिक्षणाच्या नावाखाली लुटीचा आरोप
रावेर पंचायत समितीतील समाज कल्याण विभागामार्फत गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी विनामूल्य ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण तसेच ब्युटी पार्लरचे साहित्य पुरवले जाते परंतु प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली रावेरच्या वात्सल्य ब्युटी पार्लर संस्थेने सर्व मुलींची आर्थिक फसवणूक करून अटी-शर्तीचा भंग केल्याची धक्कादायक घटना घडली. संस्थेने प्रत्येक गरीब मुलींकडून अतिरीक्त 400 रुपये प्रमाणे फि व फार्म भरण्याचे 10 रुपये अशी एकूण 410 रुपये प्रमाणे 41 मुलींकडून 16 हजार 810 रुपयांची वरकमाई केल्याचा आरोप असून प्रशिक्षणापोटी देलेले ब्युटी पार्लरचे साहित्यदेखील मुदत संपलेले दिल्याने अनेक मुलींचे चेहरे खराब झाल्याची तक्रार पंचायत समितीत तक्रार घेऊन आलेल्या मुलींनी केली आहे.




वात्सल्य ब्युटी पार्लरचा प्रताप
तालुक्यातील गरीब आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थीनींना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून रावेर पंचायत समिती समाज कल्याण विभागातर्फे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी रावेरच्या वात्सल्स ब्युटी पार्लर संस्थेची नेमणूक केली होती. यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीमागे संस्थेला पंचायत समिती तीन हजार 999 रुपये पेड करत होती. एकूण 41 मुलींना प्रशिक्षण दिल्याबद्दल रावेर पंचायत समितीने एक लाख 63 हजार 959 रुपये रावेर पंचायत समितीने वात्सल्य ब्युटी पार्लर संस्थेला दिले आहे.

संस्थेवर व्हावी कारवाई
वात्सल्य ब्युटी पार्लर संस्थेत प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींनी रावेर पंचायत समिती गाठून संस्थेवर कारवाई करण्याची मागणी तक्रारीद्वारे केली आहे. दरम्यान आम्ही खुप दिवसांपासून फिरतोय परंतु आमच्या तक्रारीकडे कुणीही लक्ष देत नसल्याची खंत प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी व्यक्त केली. वात्सल्य ब्युटी पार्लर संस्थेच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवर मोहिनी पाटील यांच्यासह सुमारे 41 गरीब विद्यार्थिनींच्या स्वाक्षर्‍या आहेत. दरम्यान, मुलींकडून 410 रुपये नियमानुसार जमा केले आहे. याबाबत सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहे. ही सर्व रक्कम मी रावेर पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागात जमा केली असून मुलींनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे वात्सल्य ब्युटी पार्लरच्या संचालक दुर्गा सोनवणे यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !