दलित वस्तीच्या कामांच्या निविदा प्रक्रिया नियमबाह्य ; 34 ग्रा.पं.च्या निविदा रद्द
रावेर : जिल्हा परीषदेने रावेर तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेच्या चौकशीचा अहवाल शुक्रवारी जाहीर केल्यानंतर तत ई निविदा काढण्याच्या प्रक्रियेत 35 पैकी 34 ग्रामपंचायतींनी अटी व शर्तींचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. या 34 ग्रामपंचायतींच्या सर्व ई निविदा रद्द केल्या असून नव्याने निविदा प्रक्रिया होणार आहे. तर चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया केली म्हणून संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई होेणार आहे. कळमोदा ग्रामपंचायतीने योग्य प्रकारे निविदा प्रक्रिया केल्याचेही या अहवालात नमूद केले आहे.
जि.प.सदस्य नंदकिशोर महाजनांची तक्रार
सन 2020-21 या वर्षात रावेर तालुक्यात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत 35 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 131 कामे मंजूर होती. या कामांच्या मंजूर निधीच्या 90 टक्के रक्कम एकूण 5 कोटी 31 लाख 75 हजार 600 रुपये पंचायत समिती स्तरावर वितरित झाले. तर कामे सुरू असलेल्या गावांना मंजूर रकमेच्या 25 टक्के निधी वितरित केला आहे. या कामांच्या इ निविदेची प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली नसल्याची तक्रार करत चौकशीची मागणी जि.प. सदस्य नंदकिशोर महाजन यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत केली होती. त्यानुसार 20 जुलैला अधिकार्यांनी चौकशी केली होती. तेव्हापासून अहवालाची तालुक्यातील नागरिकांना प्रतीक्षा होती.



या ग्रामपंचायतींच्या झाल्या निविदा रद्द
खिरवड, कोळोदा, अभोडा, मांगी, खिर्डी बुद्रुक, खानापूर, पाडले बुद्रुक, आंदलवाडी, कोचूर खुर्द, थेरोळा, वाघोड, रोझोदा, दसनूर, केर्हाळा बुद्रुक, खिर्डी खुर्द, वडगाव, अटवाडा, भोकरी, नेहेता, गौरखेडा, लोहारा, कुसुंबा खुर्द, दोधे, मांगलवाडी, जानोरी, रमजीपूर, भोर, निंबोल, कोचूर बुद्रुक, अजनाड, चोरवड, निंभोरा बुद्रुक, थोरगव्हाण.

