वलगाव जवळील रेल्वे अपघाताची चौकशी सुरू
भुसावळ : गत रविवार, 15 रोजी रात्री वलगाव-चांदूरबाजार या रेल्वे मार्गावर मालगाडीचे 22 डबे रुळावरून घसरले होते. या अपघाताची उच्च पातळीवरून दखल घेत गुरूवार आणि शुक्रवारी डीआरएम कार्यालयात चौकशी झाली. हा अहवाल मध्य रेल्वेच्या महा व्यवस्थापकांना सादर करण्यात येईल.
डीआरएम स्वतः घटनास्थळी दाखल
रविवारी रात्री 1 वाजता वलगाव स्टेशनपासून तीन किमी अंतरावर मालगाडीचा अपघात झाला. कोळसा भरून जाणार्या मालगाडीचे तब्बल 22 डबे रुळावरून घसरून पडले होते. वलगाव-चांदूरबाजार या मार्गावर सिंगल लाइन आहे. या अपघाताचा मोठ्या सुपरफास्ट गाड्यांवर याचा काही परिणाम झाला नव्हता. मात्र, कारणे शोधण्यासाठी डीआरएम एस.एस. केडिया हे स्वत: दोन दिवस तळ ठोकून होते. तसेच मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी देखील या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यासाठी विशेष चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. त्यात वरीष्ठ संरक्षा अधिकारी अलोक सिंह, वरीष्ठ मंडळ मॅकेनिकल अभियंता रूपेश कोल्हे, वरीष्ठ मंडळ इलेक्ट्रिक अभियंता (टीआरडी) एम.एम.शर्मा आणि वरिष्ठ मंडळ इलेक्ट्रिक अभियंता एस.के.झा यांचा समावेश आहे. या समितीने डीआरएम कार्यालयात दोन दिवस चौकशी केली.



