किन्ही एमआयडीसीमध्ये ट्रान्सफॉर्मर फुटला : महावितरणचे तीन कर्मचारी जखमी
भुसावळ : महावितरणच्या एमआयडीसी किन्ही येथील 33/11 केव्ही सबस्टेशन्समध्ये पोटेन्शियल ट्रान्स्फॉर्मर (पीटी) फुटल्याने दोन कर्मचार्यांसह एक अधिकारी भाजले गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली. जखमींवर जळगावातातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वीज प्रवाह वाढताच पीटीचा स्फोट
औद्योगिक वसाहत किन्ही येथील 33/11 केव्ही सबस्टेशनमध्ये तपासणी करताना विजेचा प्रवाह वाढल्याने पीटीचा स्फोट झाला. त्यात गरम ऑइल अंगावर पडल्याने जवळच काम करणारे लाईनमन मच्छिंद्र लोखंडे यांच्या पाठीचा भाग, तर कंत्राटदाराचे कर्मचारी अमोल महाजन यांच्या उजव्या हात कोपरापासून पंजापर्यत भाजला गेला. उपकार्यकारी अभियंता (भुसावळ ग्रामीण) धनंजय प्रभाकर धांडे हे भाजलेल्या कर्मचार्यास वाचवण्याचा प्रयत्न करताना धावपळीत जमिनीवर पडले. यावेळी त्यांच्या मानेवर गरम ऑइल उडून ते किरकोळ जखमी झाले. भुसावळात प्रथमोपचार करून तिघांना जळगाव हलवले. या पीटीमध्ये अचानक बिघाड कसा झाला? याची तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांनी दिली.



