तीन वर्षांपूर्वी पत्नीला पळवल्याच्या वादातून खून : संशयीतांना कोठडी
पत्नीला पळवून नेल्याच्या वाद उफाळला : पतीच्या खुनात पहिल्या पत्नीचादेखील होता सहभाग
रावेर : तीन वर्षांपूर्वी पत्नीला पळवून नेल्यानंतर झालेल्या वादाच्या खुमखुमीनंतर आठ संशयीतांनी एकाचा खून करून मृतदेह जमिनीत गाडला मात्र नातेवाईकांमध्ये वाद उफाळल्याची कुणकुण रावेर पोलिसांपर्यंत आल्यानंतर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल करीत सात संशयीतांच्या मुसक्या शनिवारी आवळल्या. संशयीतांना रावेर न्यायालयात हजर केले असता त्यांना 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयीतांनी प्रताप खुमसिंग भील (46) यांचा खून करीत मृतदेह विहिरीत टाकून नंतर जमिनीत पुरला होता. या खुनातील संशयांमध्ये मयताची तीन वर्षांपूर्वी पळून गेलेली पत्नीही सहभागी असल्याने खळबळ उडाली हेाती.
पत्नीला पळवून नेल्याच्या कारणावरून केला खून
मयत प्रताप खुमसिंग भील (46) यांची पत्नी सागरीबाई यांना सुमारे तीन वर्षांपूर्वी लक्ष्मण वेरसिंग भील याने पळवून नेल्याने प्रताप व लक्ष्मण यांच्या टोकाचे वाद झाले होते. या वादाच्या खुमखुमीतून 21 ऑगस्टच्या सुमारे 15 दिवसांपूर्वी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पाडला खुर्द शिवारात नागोरी नदीचे बाजुला असलेल्या मीराबाई गोविंदा चौधरी यांचे शेतात प्रताप भील यांचा गळा आवळून तसेच टोकरांनी डोक्यावर मारहाण करून खून करण्यात आला व मृतदेह विहिरीत टाकण्यात आला होता व नंतर अन्य आरोपींनी मृतदेह विहिरीतून काढत जमिनीत दफन केला होता.



खून प्रकरणी सातही आरोपींना पोलीस कोठडी
प्रताप भील यांच्या खून प्रकरणी संशयीत आरोपी लक्ष्मण वेरसिंग भील, सागरीबाई लक्ष्मण भील (दोघे रा.रोहिणी, ता.नेपानगर), इस्माईल हसन तडवी, महेबूब कासम तडवी (दोन्ही रा.पाडला खुर्द, टाल्या शहादा भील, जितेंद्र सुरमल भील, सुरमल शत्तरसिंग भील (तिन्ही रा.बसाली पोस्ट, बोरी बुजूर्ग, ता.जि.बर्हाणपूर, म.प्र., ह.मु.पाडला खुर्द गाव शिवार सातपुडा पर्वताचे पायथ्याशी) यांना रावेर पोलिसांनी शनिवारी अटक होती. संशयीतांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 25 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, खूनातील संशयीत झिंगला शहादा भील (भसाली बोरी, ता.जि.बुर्हाणपूर) हा पसार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. तपास रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोहर जाधव करीत आहेत.

