रावेर पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी पूर्ण : गोपनीय अहवाल जिल्हाधिकार्‍यांना होणार सादर


दोषींवरील कारवाईकडे लागले लक्ष : पुरवठा विभाग ठरला सर्वाधिक चर्चेचा

रावेर : रावेर पुरवठा विभागातील कथित भ्रष्ट्राचार प्रकरणाची संपूर्ण चौकशी पूर्ण झाली असून लवकरच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे अहवाल सादर करणार असल्याची माहिती प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी दिली. या अहवालात कोणावर ताशेरे ओढण्यात आले? याबाबत माहिती देण्यास प्रांताधिकार्‍यांनी गोपनीयतेचे कारण पुढे करीत नकार दिला आहे. या प्रकारात कोण-कोण दोषी आहे व आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार? याकडे रावेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

भ्रष्टाचार प्रकरणाची सर्वाधिक चर्चा
रावेर पुरवठा विभागातील कथित भ्रष्ट्राचार प्रकरणात प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी तालुक्यातील रेशन दुकानदारांचे लेखी खुलासे घेतले तसेच रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचादेखील लेखी खुलासा घेण्यात आला. हे प्रकरण तालुक्यात सर्वाधिक चर्चेतील प्रकरण ठरले आहे.




चौकशी पूर्ण : अहवालाकडे तालुक्याचे लक्ष
रावेर पुरवठा विभागातील कथित भ्रष्ट्राचार प्रकरणाची मागील दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशावरुन फैजपूर प्रांतधिकारी कैलास कडलग चौकशी करीत असून आतापर्यंत या प्रकरणात तालुक्यातील रेशन दुकानदारांचे लेखी खुलासे घेण्यात आले आहेत. चौकशी जरी संथगती होत असली तरी निष्पक्ष:पाती चौकशी पूर्ण झाली असल्याने रेशन दुकानदारांमध्ये समाधान आहे.

या गंभीर कारणांमुळे झाली चौकशी
रावेर पुरवठा विभागात शासकीय अर्जात परस्पर बदल करणे, अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री करणे, राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्यांचा गैरवापर करणे तसेच प्रति कार्ड तीन रुपये प्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री करणे या सह इतर कारणाची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दखल घेऊन पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांची बदली करून या प्रकरणाची चौकशी फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याकडे सोपवली होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !