धक्कादायक ! : प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे करीत घाटात फेकले
पुणे : प्रेयसीकडून सतत होणार्या त्रासाला कंटाळून प्रियकराने प्रेयसीचा खून करीत मृतदेहाचे तुकडे करीत ते पोत्यातून पिरंगुट आणि मुठा घाटात फेकून देण्यात आल्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणी हनुमंत अशोक शिंदे (40, रा.बुधवार पेठ) या संशयीताला अटक केली. या घटनेत रोजिना रीयाज पानसरे उर्फ कविता चौधरी (30, रा.बुधवार पेठ) या महिलेचा खून झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
खून करीत मृतदेहाचे केले तुकडे
संशयीत हनुमंत शिंदे मोबाईल दुरूस्तीचे बुधवार पेठेत दुकान असून मयत रोजिना ही बुधवार पेठेत देहविक्री करत असताना दोघांची ओळख होवून प्रेम संबंध निर्माण झाले. हनुमंतने रोजीनाला नारायण पेठेत फ्लॅट भाड्याने घेऊन दिला होता. हनुमंतचा विवाह झाल्याने अधुन-मधून तिच्याकडे जात होता. रोजीना हनुमंतला त्याच्यासोबत राहण्यास सांगत होती. ती त्याला घरी जाऊ देत नव्हती. 12 ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास हनुमंत रोजीनाच्या फ्लॅटवर गेला होता. त्यावेळी तिने त्याच्यासोबत तू दिवसभर घरी आला नाही म्हणून वाद करत शिवीगाळ केली. त्यावेळी रागाच्या भरात हनुमंत याने रोजिना गळा दाबून खून केला. त्यानंतर तो फ्लॅट बंद करून अक्कलकोट येथे पळून गेला होता. दुसर्या दिवशी तो पुन्हा पुण्यात आला. 14 ऑगस्ट रोजी रात्री मित्राचा छोटा टेम्पो सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने मागून घेतला. त्यानंतर कोयत्याने रोजीनाच्या मृतदेहाचे तीन तुकडे करून ताडपत्रीच्या पिशवीत भरून भुगाव ते लवासा घाट परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. त्यानंतर तो आपण कोणताच गुन्हा केला नसल्याच्या अविर्भावात फिरत होता.
