पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही केली आत्महत्या
नालासोपारा : पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने बुधवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केली. मनवेल पाडा येथील दादूस क्लासिक या इमारतीमध्ये नरेंद्रसिंह परमार (24) आणि त्याची पत्नी संतोष परमार (22) हे दोघेच भाड्याने राहत होते. या दोघांचे अडीच वर्षांपूर्वी लग्न झाले होते व मूलबाळ नव्हते. नरेंद्रसिंहच्या पोटात मंगळवारी संध्याकाळी खूप दुखत असल्याने त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले व नंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तो घरी आला. परत पोटात दुखत असल्याने पत्नीने त्याला इनो दिला, पण काही उपयोग झाला नाही व त्याचा मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे पाहून पत्नी संतोष घाबरली आणि तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा लहान भाऊ बुधवारी सकाळी कामावरून आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. दरम्यान, विरार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हलवले.
